सांगली : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार ८८५ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आतापर्यंत दोन लाख ८९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून, त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्रारंभी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सध्या काम गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९९ हजार ८८५ कुटुंबांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यापैकी मंगळवारपर्यंत दोन लाख ८९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही एक लाख कुटुुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रारंभी ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणाला विलंब झाला आहे; परंतु सध्या सुरळीत काम सुरू आहे. मराठा मागासलेपणाचा सर्वेक्षण सात दिवसांत करण्याच्या सूचना आहेत. दि. ३१ जानेवारीची मुदत दिली आहे. या कालावधीत काम पूर्ण होणार नसल्याने दोन दिवस मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली आहे. जिल्ह्यातील एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
मागणी केल्यास दाखला मिळणारमराठा कुणबी दाखल्यांसाठी जेवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. सध्या एकही कुणबी प्रमाणपत्राची मागणी नाही; मात्र कुणबी दाखल्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास पडताळणी करून तत्काळ दाखले देण्यात यावेत, अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या असल्याचे डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.