अशोक डोंबाळेसांगली : महाराष्ट्राच्या लालपरीच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी सांगली विभागात ११ महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण असून, सध्या त्या दुसऱ्या टप्प्यातील ८० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्या एप्रिलमध्ये लालपरीचे सारथ्य करणार आहेत. उर्वरित पाच महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे.स्त्रीही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरुषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी. महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला चालक नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांतर्गत येणाऱ्या सांगली विभागात एकूण ११ महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. या सर्व महिला राज्यातील विविध जिल्ह्यांतील आहेत. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील तीन हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण एप्रिलला पूर्ण होईल आणि लालपरीचे स्टेअरिंग या महिलांच्या हाती येईल.
वर्षाचे प्रशिक्षण पूर्णस्वप्नाली सुवरे (देवरुख), कविता पवार (बीड), शारदा मदने (कोल्हापूर), सुवर्णा बनसोडे (कऱ्हाड), नसीम तडवी (जळगाव), सीमा लोहार (सांगली) या महिलांचे वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या ८० दिवसांचे प्रशिक्षण घेत असून, त्यापैकी ३० दिवसांचे प्रशिक्षण राहिले आहे. ३० दिवसांचे प्रशिक्षण झाल्यानंतर एप्रिलमध्ये शहरी बसेसचे सारथ्य त्या महिला करणार आहेत.
वर्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलास्मिता मदाळे (कोल्हापूर), अंजुम पिरजादे (आष्टा), मीनाताई व्हनमाने (सांगली), ज्योती ठोसर (जळगाव) आणि सरोज हांडे (कोल्हापूर) या महिलांचे एसटीच्या सांगली विभागात निवड झाली आहे. सध्या वर्षाचे प्रशिक्षण घेत असून, ते पूर्ण झाल्यानंतर ८० दिवसांचे प्रशिक्षण त्यांना घ्यावे लागणार आहे.
कोकणातील पहिली महिला चालकएसटीमध्ये चालक म्हणून निवड झालेली मी कोकणातील पहिली महिला आहे. आई-वडील शेतकरी असतांनाही त्यांनी एसटीत चालक होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हणूनच वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून सध्या ८० दिवसाचे प्रशिक्षण सांगलीत चालू आहे. ते ३० दिवसांत संपणार आहे. त्यानंतर, लालपरीचे आम्ही खऱ्या अर्थाने सारथ्य करणार आहोत, असे स्वप्नाली सुवरे यांनी सांगितले.