अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आभाळाएवढ्या संकटात मनोबलावर टिकता येते... आव्हान देऊन त्यावर मातही करता येते... केवळ प्रेरणादायी कहाण्या सांगून नव्हे, कृतीतून जगून लोकांसमोर त्या मांडल्या, तर मनोबलाचे संक्रमण होऊन समाज सुदृढ होऊ शकतो. तुंग (ता. मिरज) येथील कविता अशोक पाटील या तरुणीने व्हिलचेअरवरून गावोगावच्या पूरग्रस्तांना दिलेली मदत, खच्ची झालेल्या मनांना लढण्याचे बळ देऊन गेली.यंदाच्या महापुराने भल्या-भल्यांना हादरवून सोडले. उरात धडकी भरवणारा पाऊस आणि समुद्राच्या उधाणलेल्या लाटांसारखी वस्त्यांना कवेत घेणारी नदी आठवली तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. होत्याचे नव्हते झाल्याचा अनुभव हजारो कुटुंबांना आला. ज्यांचे थोडे फार बचावले, तेही मनाने खचले. राज्यभरातून मदतीचे लाखो हात या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले. अनेकांनी आधार दिला. अजूनही हे काम अखंडित सुरू आहे. या सर्व गर्दीत कविता पाटील या दिव्यांग तरुणीने पूरग्रस्तांच्या मनांना सक्षमतेचे दान दिले. महापुरात अडकलेले, पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित झालेले लोक पाहून कविता अस्वस्थ झाली. स्वत: दिव्यांग असूनही तिने स्थापन केलेल्या ‘कल्पतरु फाऊंडेशन’मार्फत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार तिने केला. आयुष्याच्या सफरीत पाठीचा भक्कम कणा म्हणून भूमिका बजावलेल्या तिच्या वडिलांनी तिला याकामीही मदत करण्याचे ठरविले आणि त्यांची मदतीची ही गाडी पळू लागली.राज्यभरात कविताचे अनेक दिव्यांग मित्र-मैत्रिणी आहेत. सोशल मीडियावरून तिने तिच्या मदतीचा निर्धार सर्वांना सांगितला. दिव्यांग लोकांसह अनेकांनी तिला शक्य तेवढी मदत पाठविली. तिला पदरमोडही करावी लागली. ५ किलो गहू, २ किलो तांदूळ, सॅनिटरी नॅपकिन व अन्य साहित्य असे कीट तयार करून ती एका वाहनातून पूरग्रस्त भागात जात असे आणि त्याठिकाणच्या पूरग्रस्तांना व्हिलचेअरवरून फिरून मदत वाटत असे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला तिचा हा उपक्रम रविवारी पूर्ण झाला.तुंग, आष्टा, कर्नाळ, पद्माळे, सुखवाडी, अंकलखोप, चोरपडेवाडी आदी गावांमध्ये कविताने व्हिलचेअरवरून मदतीचे वाटप केले. तिचा हा खारीचा वाटा पूरग्रस्तांना सर्वात मोठा आधार देऊन गेला. एक दिव्यांग युवती आयुष्यातील मोठ्या संकटाला तोंड देऊन सक्षमपणे उभारून लोकांना सढळ हाताने मदत करीत असल्याचे हे चित्र संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना लढण्याचे बळ देऊन गेले.मैत्रीची अनोखी कहाणीकविता व तिची मैत्रीण अमृता मोरे यांची कहाणीही अनोखी आहे. अमृता ही दिव्यांग नसतानाही तिने आपल्या या मैत्रिणीला कायम साथ दिली. सध्या ती बेंगलोर येथे असली तरी, तिथून ती कविताला प्रत्येक कार्यात प्रोत्साहन व मदत करीत असते. कविता तिला स्वत:चे पाय आणि वडिलांना पाठीचा कणा समजते.असे आले अपंगत्व...आठ महिन्यांची असताना कविताला पाठीत गाठ होती. तिच्यावरील शस्त्रक्रियेवेळी स्पाईन इंज्युरी (पाठीचा कणा जखमी) झाल्याने कमरेपासून खालील भाग संवेदनाहीन झाला. त्यामुळे तिला दिव्यांग म्हणून जगावे लागत आहे. आई, वडील, छोटा भाऊ, एक बहीण असा तिचा परिवार आहे. शिकण्याची जिद्द आणि कुटुंबीयांचे पाठबळ यामुळे तिने एम.ए. बी.एड्.पर्यंतचे शिक्षण घेतले. आता तुंग ग्रामपंचायत सदस्या म्हणून ती कार्यरत आहे.
व्हिलचेअरवरील तरुणीच्या मदतीने पूरग्रस्तांना लढण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:40 PM