सांगली : करूंगली-आरळा (ता. शिराळा) येथील निनाईदेवी साखर कारखान्याची तारण असलेली साडेचौदा हेक्टर जमीन परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने राज्य सहकारी बँक व दालमिया शुगर यांच्याविरोधात आज (शुक्रवारी) उच्च न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. जिल्हा बँकेने हे पाऊल उचलल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. निनाईदेवी कारखान्याला जिल्हा बँकेने २००२ मध्ये आठ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जापोटी कारखान्याने बँकेकडे १४.६५ हेक्टर गायरान जमीन तारण दिली होती. या जमिनीच्या सातबाऱ्यावर बँकेने स्वत:चे नाव चढवले आहे. जिल्हा बँकेप्रमाणेच ‘निनाई’वर राज्य बँकेसह इतर संस्थांची कर्जे आहेत. राज्य बँकेने सहभाग योजनेतून ‘निनाई’ला १४ कोटींचे कर्ज दिले होते. गेल्या काही वर्षांत कारखाना अडचणीत आला आणि बंद झाला. त्यानंतर राज्य बँकेने कर्जाच्या वसुलीची प्रक्रिया सुरू केली. राज्य बँक व सहभाग योजनेतील अन्य बँकांच्या मिळून १०० कोटीच्या वसुलीसाठी कारखाना विक्रीसाठी काढला. हा कारखाना दालमिया शुगर या खासगी कंपनीने २४ कोटी रुपयांना विकत घेतला. राज्य बँकेने कारखान्याची मालमत्ता विक्री करताना जिल्हा बँकेकडील ाारण असलेली १४.६५ हेक्टर जमीनही दालमिया शुगरला विकली आहे. वास्तविक निनाईदेवी कारखान्याने जिल्हा बँकेला स्वतंत्ररित्या जमीन तारण दिली होती. त्यामुळे आज जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्य बँक व दालमिया शुगरने जिल्हा बँकेला अंधारात ठेवून त्यांच्याकडील तारण असलेली जमीन परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार न्यायालयात दाखल केली आहे. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक‘निनाईदेवी’च्या उभारणीवेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी साडेचौदा हेक्टर गायरान जमीन कारखान्याला दिली होती. अजूनही या जमिनीवर शासनाचे नाव आहे. जिल्हा बँकेला कर्जतारण देतानाही ‘निनाईदेवी’च्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती, पण राज्य बँकेने जिल्हाधिकारी व जिल्हा बँकेला अंधारात ठेवून जमीन विक्रीचा व्यवहार केल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य बँकेसह दालमिया शुगरविरोधात फौजदारी
By admin | Published: December 06, 2014 12:19 AM