अविनाश कोळी सांगली : कोरोना व्हायरसच्या दहशतीने परदेशी आणि देशांतर्गत सहलींची जवळपास ९0 टक्के आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. गेल्या कित्येक वर्षात हवाई वाहतूक, ट्रॅव्हल्स्च्या तिकीटदरात घसरण होऊनही प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना फटका बसला आहे.देशात, राज्यात साखळी पद्धतीने काम करणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सीज्ची संख्या सांगली जिल्ह्यात विस्तारली आहे. गेल्या आठ वर्षात परदेशी सहलींचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात शंभरहून अधिक एजन्सीज् कार्यरत आहेत. याशिवाय वैयक्तिक सहली आरक्षित करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
या सर्व एजन्सीज्ना आणि सहलीचे नियोजन करणाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव जगभरात होत असल्याने अनेक ठिकाणी विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे नियोजित सहली रद्द झाल्या आहेत. प्रवाशांकडूनच सहली रद्द करण्याचे प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढल्याचा अनुभव ट्रॅव्हल एजंटांना येत आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत विदेशी सहलींचे प्रमाण ९0 टक्क्यांपर्यंत घटले आहे.देशांतर्गत सहलींनाही याचा फटका बसला आहे. बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद, हिमाचल प्रदेश-मनाली, उटी, जम्मू, राजस्थान, काश्मीर येथे दरवर्षी सांगली जिल्ह्यातून पर्यटक जात असतात, पण देशातही कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने या सहलीही रद्द होत आहेत. देशांतर्गत सहली रद्द होण्याचे प्रमाण ७0 टक्क्यांवर आहे. आता पुण्यात संशयित आढळले असल्याने देशांतर्गत पर्यटनालाही मोठा ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.