सांगली : गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. दत्तात्रय भीमराव बंडगर (रा. हनुमान मंदिर समोर संजयनगर, सांगली ) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ८९ हजार ८७८ रुपयांच्या मद्याच्या बाटल्या, चारचाकी वाहन असा एकूण १ लाख ८९ हजार ८७८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरातील संजयनगर येथे हनुमान मंदिरासमोरील बाजूस एका चारचाकी वाहनातून बेकायदा मद्य विक्री करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक बजरंग पाटील, दुय्यम निरीक्षक हनमंत यादव यांच्या पथकाने संजयनगर परिसरात सापळा लावला.
त्यावेळी मद्याचे बारा बॉक्स तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी दत्तात्रय भीमराव बंडगर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित बंडगर याला न्यायालयासमोर हजर केले असता २३ पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.