अविनाश कोळी सांगली : कोरोनामुळे अस्थिर झालेल्या वातावरणात घराकडे परतण्याचा बेत आखलेल्या हजारो कामगारांची पावले आता कारखान्यांची धडधड ऐकून परतू लागली आहेत.
अनेक वर्षांपासूनचे कारखान्याशी, सांगलीच्या मातीशी असलेले नाते अशा संकटात अधिक घट्ट करण्यासाठी सरसावलेल्या या कामगारांमुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामगारांच्या कुटुंबियांनीही रोजगाराला प्राधान्य दिल्यामुळे या कामगारांना काम करण्यास बळ मिळाले आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड येथील औद्योगिक क्षेत्रात १२ हजारावर परप्रांतीय कामगार आहेत. यातील बहुतांश कामगारांनी अन्य व्यवसायातील परप्रांतीय कामगारांप्रमाणेच आपल्या राज्यात व घराकडे परतण्याची तयारी केली होती.
एका रेल्वेतून एक हजाराहून अधिक कामगार उत्तर प्रदेशला रवाना झाले. पण ते त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने, येथेच थांबलेल्या उर्वरित कामगारांनी रोजगाराला प्राधान्य देत सांगलीतच थांबण्याचा निर्णय घेतला.
कुपवाड व मिरज एमआयडीसी, सांगलीतील वसंतदादा औद्योगिक वसाहत याठिकाणी बहुतांश कारखान्यांची धडधड सुरू झाली असून, स्थानिक कामगारांबरोबरच परप्रांतीय कामगारही कामावर रुजू झाले आहेत. उद्योजकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.