सांगली : कवलापुरात विमानतळ साकारण्याच्या प्रतिक्षेत सांगलीकरांची एक पिढी म्हातारी झाली, पण विमान काही उतरलेच नाही. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीकरांसाठी मिरज-सोलापूर महामार्गावर छोटे विमान उतरविण्याची तयारी केली आहे. निमित्त आहे लॉजिस्टीक पार्कचे.मुंबईत शनिवारी (दि. ५) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदग्रहण व विकास परिषदेत त्यांनी विमानोड्डाणाचे स्वप्न दाखविले. सांगली डेव्हलपमेन्ट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांच्याकडे जिल्ह्यात लॉजिस्टीक पार्कचा आग्रह धरला. त्यानुसार मिरज-सोलापूर महामार्गावर पार्क उभारण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मिरज ते सोलापूरदरम्यान बहुतांश पूर्णही झाले आहे. याच महामार्गावर छोटे विमान आपण उतरवू शकतो असे गडकरी म्हणाले. लॉजिस्टीक पार्क म्हणजे सर्व प्रकारच्या मालवाहतुकीसाठीचा तळ होय.त्याला रस्त्याने, हवाईमार्गे, रेल्वेने व जलवाहतुकमार्गे वाहतुकीच्या सोयी जोडलेल्या असतात. मिरज-सोलापूर महामार्गावर सध्या जलवाहतूक वगळता रस्ता व रेल्वे या सुविधा उपलब्ध आहेत. उर्वरीत हवाई मार्गाची कसर छोट्या विमानाने भरुन काढता येईल असे सुतोवाच गडकरी यांनी केले.
यानिमित्ताने सांगलीकरांचे विमानाचे स्वप्न हवेतच राहणार नाही हा दिलासा मिळाला आहे. कवलापुरातून नाही म्हणून काय झाले?, हायवेवरुन तरी आकाशात झेप घेता येईल अशी आशा गडकरी यांनी जागविली आहे.परिषदेला चेंबरचे अध्यक्ष ललीत गांधी यांच्यासह सांगलीतून माणगावे, संजय अराणके, भालचंद्र पाटील, रमेश आरवाडे, रमाकांत मालू, स्वप्नील शहा, विलास गोसावी, प्रकाश शहा आदी उपस्थित होते.लॉजिस्टीक पार्कमधून हैदराबादसह, कर्नाटकातही वाहतूकलॉजिस्टीक पार्कमधून हैदराबादसह, कर्नाटकातही वाहतूक चालेल. मोठा रोजगार उपलब्ध होईल. सांगलीच्या व्यापारउदीम, उद्योगवाढीस चालना मिळेल. खासदार संजयकाका पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी पार्कसाठी गडकरी यांना साकडे घातले होते.