विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीसाठी बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
-
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेल्यामुळे पालक आर्थिकदृष्ट्या त्रस्त आहेत. शाळाही बंद असून ऑनलाईनच शिक्षण दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने अनुदानितसह सर्वच खासगी शाळांचे या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. कोरोना काळामध्ये सर्वजण आर्थिकदृष्ट्या त्रस्त आहेत. शैक्षणिक वर्षही संपत आले आहे. तरीही खासगी शाळांचे संस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षक शैक्षणिक शुल्कासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करीत आहेत. पालकांवर शुल्क भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. या शैक्षणिक संस्थांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. तसेच या शैक्षणिक वर्षातील शुल्क माफ करावे, अशी मागणी बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सचिन सवाखंडे यांनी केली आहे. याच मागणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
यावेळी प्रभात हेटकाळे, श्वेतपद्म कांबळे, गणेश चिकुर्डेकर, पियूष भाटे, बापू सोनवणे, योगेंद्र कांबळे, तौफिक मुजावर, अभिषेक कांबळे, संतोष सवादे आदी उपस्थित होते.