लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : य. मो. मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार, १२ जुलै रोजी होत आहे. डॉ. सुरेश भोसले यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड निश्चित आहे, परंतु उपाध्यक्षपदी पहिल्या अडीच वर्षांसाठी वाळवा तालुक्याला संधी मिळणार का याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
वाळवा तालुक्यात जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक असलेले संजय पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, जयश्री पाटील, लिंबाजी पाटील, संभाजी पाटील, शिवाजी पाटील हे सात संचालक आहेत, तर जितेंद्र पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. इंदुमती जाखले महाडिक गटाच्या आहेत. यापैकी राष्ट्रवादीचे चार संचालक उपाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहेत.
मागील टर्ममध्ये वाळवा तालुक्यातील लिंबाजी पाटील यांनी वाळवा तालुक्याकडे उपाध्यक्षपद खेचून आणले. यावेळीही उपाध्यक्षपद मिळावे म्हणून येथील संचालकांनी मुंबईत जाऊन जयंत पाटील यांना साकडे घातले आहे. यात इस्लामपूरचे संजय पाटील आघाडीवर आहेत. या पदासाठी पूर्ण वेळ देऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनीही पुन्हा संधीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जयश्री पाटील यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन उपाध्यक्षपद महिलेला असावे, अशी मागणी केली आहे. जयंत पाटील यांचे नातेवाईक संभाजी पाटील हेही दावेदार आहेत. नेर्ले या गावाला ‘कृष्णा’च्या कार्यक्षेत्रात अधिक महत्त्व आहे. कारखान्यात या गावातील दोन संचालक नेहमीच असतात. यंदा संभाजी पाटील तेथील असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे जितेंद्र पाटील हे भोसले यांचे समर्थक असल्याने तेही या स्पर्धेत आहेत.
चौकट
दोस्तीसाठी काय पण..!
लिंबाजी पाटील आणि संजय पाटील यांची दोस्ती सर्वज्ञात आहे; परंतु उपाध्यक्ष पदावर दोघांनीही दावा केला आहे. लिंबाजी पाटील यांना यापूर्वी संधी मिळाली आहे. त्यामुळे यावेळी लिंबाजी पाटील मित्राची शिफारस करतील, अशी भावना संजय पाटील समर्थकांची आहे.