सांगली : काही विघ्नसंतोषी लोकांकडून सतत जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापन करून असे डाव हाणून पाडण्यात येतील, असा निर्धार सांगलीतील बैठकीत करण्यात आला.सांगलीच्या वृत्तपत्र विक्रेता भवनात बुधवारी सर्वधर्मीय कार्यकर्त्यांची, नागरिकांची बैठक पार पडली. निमंत्रक सतीश साखळकर यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरजेसारख्या शहरात दंगली घडविण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोक प्रयत्न करीत आहेत. जातीय, धार्मिक तेढ वाढेल, अशी वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे हा डाव ओळखूनच तो हाणून पाडण्यासाठी तसेच धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय बैठक बोलावली आहे. सांगली, मिरजेत सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना हा सलोखा बिघडविण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.बैठकीस गौतम पवार, पृथ्वीराज पवार, ॲड. अमित शिंदे, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, तौफिक शिकलगार, रवींद्र शिंदे, युनूस महात, फिरोज पठाण, चंदन चव्हाण, शंभुराज काटकर, डॉ. संजय पाटील, प्रा. रविंद्र ढाले, रेखा पाटील, रजाक नाईक, ताजुद्दीन शेख, आयुब बारगीर, जसबीर कौर, तोहिद मुजावर आदी उपस्थित होते.कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिकसामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, असे प्रकार रोखण्यासाठी शहरातील सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय पक्षांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनी चुकीचा प्रकार घडल्यास त्याची माहिती द्यावी.बैठकीतील निर्णय
- सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या समित्या विविध भागांमध्ये स्थापन हाेणार
- सामाजिक सलोखा राखण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार
- सण, उत्सवातील शांततेसाठी प्रयत्न करण्यात येणार
- पोलिस व प्रशासनास समित्या सहकार्य करण्यासाठी अग्रेसर राहतील