अविनाश कोळी
सांगली ,दि. ०२ : राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचालीला समृद्धीचा मंत्र देणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रवास राजकीय कोरडेपणाचा अनुभव घेत औपचारिकतेच्या वाटेवरून सुरू आहे. कार्यक्रमांचा दुष्काळ सोसत येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष संपणार असतानाही समारोपाचे नियोजन बारगळल्याचे चित्र दिसत आहे.
थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल अशी विशालकाय वाटचाल करीत राज्याच्या जडणघडणीत वसंतदादांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण मानले गेले. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दादांनी सहकार, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य मैलाचा दगड ठरला आहे.
या कार्याचा उचित गौरव करण्याची वेळ जन्मशताब्दी वर्षानिमित्त आली होती. शासनाने या जन्मशताब्दीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. १३ नोव्हेंबर २०१६ रोजी जन्मशताब्दी वर्षास सुरुवात होऊनही शासनाने यासाठीची समिती ५ डिसेंबरला गठित केली. त्यानंतर वर्षभरात विविध कार्यक्रम घेण्याचे कागदी नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात नियोजनातील कोरडेपणाचे दर्शन शासनाने घडविले.
कॉँग्रेसच्या नेत्यांनी या गोष्टीचे भान ठेवत जन्मशताब्दी समिती स्थापन केली. अनेक दिग्गज नेत्यांना या समितीत समाविष्ट करण्यात आले. शताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच सांगलीत मोठा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर काही कार्यक्रम राज्यात झाले. तरीही वर्षभर जन्मशताब्दी वर्षाचा उत्साह टिकला नाही. येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष संपणार आहे. तरीही यासंदर्भात समितीची एकही बैठक झाली नाही. येत्या ८ नोव्हेंबरला सांगलीत कॉँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आक्रोश मेळावा आहे.
सध्या या मेळाव्याची तयारी सांगलीत सुरू झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे नियोजन करणे नेत्यांना शक्य होणार नाही. त्यानंतर बरोबर चार दिवसांनी वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप होणार आहे. त्यामुळे समारोपाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन बारगळले आहे. वसंतदादांचा जन्म ज्या सांगली जिल्ह्यात झाला त्याठिकाणचे हे चित्र वसंतदादांच्या कार्याच्या वाटेला आलेल्या उपेक्षितपणाचा दाखला आहे.
दोनच कार्यक्रम उठावदारवसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा या डिजिटल बुक व आॅडिओचा प्रकाशन सोहळा जन्मशताब्दी वर्षाला साजेसा ठरला. लोकमतचे सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने लिखित या बुकच्या प्रकाशन सोहळ््याचे आयोजन मातृभूमी प्रतिष्ठानने केले होते.
सांगलीतील जन्मशताब्दी प्रारंभाचा आणि मुंबईतील दादांच्या डिजिटल बुकच्या प्रकाशनाचा कार्यक्रमच सर्वाधिक उठावदार ठरला. वास्तविक वर्षभर असे विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविणे आवश्यक होते.समिती कागदावरचराज्य शासनाने नियुक्त केलेल्या जन्मशताब्दी समितीवर राज्यातील अनेक दिग्गज राजकारण्यांचा समावेश करण्यात आला. या समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष आहेत. ही समिती आता दहा दिवसांत संपुष्टात येईल. ११ महिन्यांच्या कालावधित शासनाने समितीमार्फत कार्यक्रम राबविण्यासाठी दमडीचीही तरतूद केली नाही. त्यामुळे ही समिती कागदावरच राहिली.
केवळ पक्षीय महत्त्व वाढविण्याकडे लक्ष असल्यामुळे महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या दिवंगत नेत्यांबद्दल सध्याच्या सरकारला फारसा आदरभाव नाही. त्यामुळेच औपचारिकता म्हणून वसंतदादांच्या जन्मशताब्दीची समिती गठित करण्यात आली. समितीच्या माध्यमातून वर्षभर कार्यक्रम होणे आवश्यक होते; मात्र त्यांचा त्यात रस दिसला नाही.- आ. जयंत पाटील,|नेते, राष्ट्रवादी