राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक, इद्रिस नायकवडी यांचा दावा
By अशोक डोंबाळे | Published: January 24, 2024 03:52 PM2024-01-24T15:52:46+5:302024-01-24T15:53:03+5:30
भाजप व राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी भिन्न, पण..
मिरज : राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी सांगली, मिरजेतील अनेक माजी नगरसेवक इच्छुक आहेत. मात्र त्यांचा पूर्व इतिहास व पक्षाला होणारा फायदा पाहूनच त्यांना प्रवेश मिळणार असल्याचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सांगली महापालिका निवडणूक अजितदादा गट भाजपसोबत लढणार आहे. मिरजेतील काही माजी नगरसेवक मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाची चर्चा करतात. मात्र, येथे आल्यानंतर निधीसाठी भेट घेतल्याची सारवासारव करतात. मात्र अशांचा पूर्व इतिहास, त्यांचा हेतू, उद्देश व पक्षास होणारा फायदा बघूनच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळेल, असेही नायकवडी यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे नाव न घेता सांगितले.
राज्यात बार्टीच्या धर्तीवर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची (मार्टी) स्थापना होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी याची घोषणा होईल. याद्वारे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणासाठी मदत करण्यात येणार असल्याने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार आहे. राज्यसरकारने वक्फ बोर्डाच्या जमिनी संरक्षित करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे वक्फ जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही. भाजपचा विरोध असला तरी माजी मंत्री नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबतच असून आमच्या पक्षात कोण असावे हे अजितदादाच ठरवतील.
विचारसरणी भिन्न पण..
आम्ही विकासासाठी एकत्र असल्याचे भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षाची विचारसरणी भिन्न आहे. आमची युती वैचारिक नसून राजकीय आहे. भाजपसोबत असले तरी अजितदादांनी सेक्युलर विचारसरणी सोडलेली नाही. भाजपसोबत विकासासाठी एकत्र आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येत राममंदिराची उभारणी झाली हे चांगलेच झाले. यामुळे एक वाद संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह हे अजितदादा गटालाच मिळणार असल्याचा दावा नायकवडी यांनी केला.