मिरज : मिरज पॅटर्नमधील माजी नगरसेवक विधानसभेला पालकमंत्री सुरेश खाडे यांचा प्रचार करणार आहेत. मिरजेतील काँग्रेस राष्ट्रवादी व लोकसभेला विरोधात असलेल्या भाजपच्या बंडखोर माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्न मधील सर्व पक्षीय नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी सुरेश आवटी यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांनी लोकसभेला भूमिका वेगळी मात्र विधानसभेला सुरेश खाडे यांच्या सोबतच राहू असे सांगितले होते. आता मिरजेतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी विधानसभेला पालकमंत्री खाडे यांच्यासोबत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. यावेळी सुरेश आवटी यांनी लोकसभेला पक्षाविरोधात जाऊन आम्ही पक्षाचा राजीनामा दिला. मात्र, पक्षाने राजीनामा स्वीकारला नसल्याने आम्ही भाजपमध्येच असल्याचे सांगितले.मिरजेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचे माजी नगरसेवकांनी जाहीर केले. यावेळी मिरज पॅटर्न मधील सर्व नगरसेवकांतर्फे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवा नेते सुशांत खाडे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर संगीता खोत, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक, संदीप आवटी, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे, बबिता मेंढे, माजी नगरसेवक करण जामदार, अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, भाजप नेते गजेंद्र कल्लोळी, राष्ट्रवादी नेते चंद्रकांत हुलवान, भाजपचे सुमेध ठाणेदार यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होती. काँग्रेसचे संजय मेंढे व करण जामदार यांनी पालकमंत्र्यांनी विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. मात्र विधानसभेला प्रभागातील मतदारांना विचारून निर्णय घेऊ अशी सारवासारव केली.
विरोधक सोबतरिपाइं युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासोबत असलेला राजकीय वाद मिटला असल्याचे व योगेंद्र थोरात प्रभाग वीसमध्ये निवडणूक न लढविता ते प्रभाग सातमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. लोकसभेला विरोधात असलेल्या शहरातील नेत्यांना विधानसभेला सोबत घेऊन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी विरोधकांवर मात केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निधी देताना पक्षपात केला नाहीविकासकामासाठी निधी देताना लोकप्रतिनिधी म्हणून मी कधीच पक्षपात केला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीला मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचे स्वागत करतो, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.