विटा : विटा नगरपालिकेच्या मावळत्या कौन्सिलने पाठपुरावा करून ३२ कोटी रुपये मंजूर करून घेतलेल्या आणि मुबलक व उच्च दाबाने पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम महिन्याभरामध्ये होईल. पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना विरोधकांनी नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगत केवळ राजकारणासाठी प्रशासनाला वेठीस धरत आदळ आपट सुरू केली असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी केला.भिंगारदेवे म्हणाले की, विटा शहराच्या ७० हजार लोकसंख्येसाठी प्रती मानसी १३५ लिटर म्हणजे प्रती दिन ९५ लाख लिटर पाणी गरज गृहीत धरली आहे. यासाठी विटा नगर परिषदेच्या मावळत्या कौन्सिलने राज्य शासनाकडून ३२ कोटी रुपये खर्चाची सुधारित पाणी योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत घोगांव येथील पाणी उपसा करण्यासाठी सध्याचे २२५ अश्वशक्तीचे तीन पंप बदलून प्रती ताशी ३ लाख लिटरपेक्षा जास्त उपसा क्षमता असलेले ३०० अश्वशक्तीचे तीन नवीन पंप बसविण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.वस्तुस्थिती समजून न घेता शहरातील विरोधक या प्रश्नाचे राजकीय भांडवल करून शहरवासीयांची सहानुभूती मिळविण्याचा व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकारणासाठी प्रशासनास वेठीस धरत आदळ-आपट करू नये, असा सल्ला माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी दिला.
विट्यात राजकारणासाठी विरोधकांची आदळ-आपट, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 3:42 PM