दिलीप मोहितेविटा : विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असतानाच खानापूर मतदारसंघातील महायुतीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील व राजेंद्रअण्णा देशमुख हे दोन दिग्गज नेते गुरुवारी कडेगावात महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसले. त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दाेघांशी व्यासपीठावरच संवाद साधला. यानंतर, इस्लामपूरच्या ‘साहेबांनी’ महायुतीच्या ‘भाऊ-आण्णांना’ कोणता कानमंत्र दिला, याची चर्चा सभास्थळी सुरू झाली होती.
खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर, अजितदादा गटातून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र ॲड. वैभव पाटील आणि आटपाडीतील विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. महायुतीतून शिंदे गटाचे सुहास बाबर यांच्या उमेदवारीवर बुधवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आढावा बैठकीतच शिक्कामोर्तब केले.त्यामुळे ॲड. वैभव पाटील कोंडीत सापडले आहेत. दुसरीकडे आटपाडीतील भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मौन बाळगले असले तरी माजी आमदार सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांनी त्यांच्याशी जवळीक साधली आहे. गुरुवारी कडेगाव येथे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या लाेकतीर्थ स्मारक अनावरणप्रसंगी कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. सभा सुरू होण्यापूर्वीच राजेंद्रअण्णा देशमुख सभास्थळी दाखल झाले. काही वेळाने सदाशिवराव पाटील व राजेंद्रअण्णा देशमुख या दोघांनी एकत्रित थेट व्यासपीठावरच प्रवेश केला. तेथेही दोन्ही नेते शेजारी बसले. दुपारी २ वाजता राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यात आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता.पुढल्या रांगेत बसलेले जयंत पाटील मागे सदाशिवराव पाटील व राजेंद्रअण्णांना देशमुख पाहून जागेवरून उठले. मागील बाजूस जाऊन त्यांनी व्यासपीठावरच उभे राहून दाेन्ही नेत्यांशी जवळपास पाच मिनिटे चर्चा केली. चर्चेत जयंत पाटील यांना सदाशिवराव व राजेंद्रअण्णांना कोणता कानमंत्र दिला, याची चर्चा सभास्थळी रंगली.