Sangli: इद्रीस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखी एक आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 05:05 PM2024-10-15T17:05:12+5:302024-10-15T17:10:00+5:30
मिरज : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली. ...
मिरज : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर मिरजेला विधान परिषदेवर संधी मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
सध्या इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आहेत. मुस्लीम समाजाची नाराजी दूर करण्यासाठी नायकवडी यांना संधी मिळाल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. राष्ट्रवादीत फूट पडून ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री जयंत पाटील यांचे विरोधक मानले जाणारे इद्रीस नायकवडी यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर महापालिका क्षेत्रात त्यांनी अजित पवार गटात विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणले होते. त्यामुळे नायकवडी यांना ताकद देण्यासाठी अजित पवार यांनी त्यांची विधान परिषदेसाठी शिफारस केल्याचे बोलले जात आहे.
जयंत पाटील गटाला धक्का
सांगली व मिरजेतील काही माजी नगरसेवक महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत. काही महिन्यांपूर्वी अजित पवार सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात इद्रीस नायकवडी यांना ताकद देऊन जयंत पाटील यांना धक्का देण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर इद्रीस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.