सांगली : सांगली महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना प्रभाग ११ मध्ये माजी महापौर किशोर शहा पैसे वाटप करीत असल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांनी केल्याने संजयनगर पोलिसांनी शहा यांना ताब्यात घेतले. याच प्रभागातील मतदारांना पैशाचे आमिष दाखविल्याप्रकरणी माजी नगरसेवक रमेश सर्जे यांच्यासह तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
प्रभाग ११ मध्ये माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर झोपडपट्टीचा भाग येतो. बुधवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना दुपारी बारा वाजता माजी महापौर किशोर शहा मतदारांना पैसे वाटत असल्याची तक्रार भाजपच्या काही नेत्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून केली. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, हवालदार दिनेश माने यांनी झोपडपट्टीकडे धाव घेतली. तोपर्यंत भाजप व काँग्रेस-राष्टवादीचे उमेदवार, कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी शहा यांना ताब्यात घेतले. त्यांना संजयनगर पोलीस ठाण्यात आणून बसवले. या कारवाईची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर शहा यांना पोलिसांनी सोडून देण्यात आले.दरम्यान, प्रभाग ११ मधील परिवर्तन विकास पॅनेलच्या उमेदवार नीता रमेश सर्जे यांच्या प्रचाराकरिता मतदारांना पैशाचे आमिष दाखविल्याप्रकरणी रमेश सर्जे, राहुल भरत बुरुड (वय २९) व संदीप कनिफनाथ साळे (२८, दोघे रा. पंचशीलनगर, रेपे प्लॉट, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३३ हजार चारशे रुपयांची रोकड, कागदी पुठ्ठ्याची चौकोनी आकाराची इव्हीएमची प्रतिकृती, तीन मोबाईल, मोटार व परिवर्तन विकास आघाडीची प्रचाराची ३८ पत्रके असा चार लाखांचा माल जप्त केला आहे. जुना बुधगाव रस्त्यावर फैयाज मेस्त्रीच्या गॅरेजशेजारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. जप्त केलेल्या इव्हीएमच्या प्रतिकृतीत एक ते सहा रकाने आहेत. त्यापैकी चार क्रमांकाच्या रकान्यासमोर ‘सर्जे नीता रमेश’ असे नाव होते. नावासमोर त्यांचे चिन्हही होते. अन्य रकान्यांमध्ये आटपाडे सुरेश शंकर, पाटील सुनीता संजय व पाटील शीतल या उमेदवारांची नावे आहेत. या यंत्रातील किती क्रमांकाचे बटण दाबायचे, याचे प्रात्यक्षिक दाखवून प्रत्येकी एका मतासाठी एक हजार रुपयाचे आमिष दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.इव्हीएमसोबत छायाचित्र : दोघांवर गुन्हासांगलीवाडीत पतंगराव कदम महाविद्यालयातील मतदान केंद्रावर राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार हरिदास पाटील मतदान करत असताना इव्हीएमसोबत त्यांचे मोबाईलवर छायाचित्र काढून गुप्त मतदान पद्धतीचा भंग केल्याप्रकरणी चेतन सच्चिदानंद कदम (वय २५, रा. कदम प्लॉट, सांगलीवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच केंद्रावर भाजपचे उमेदवार अजिंक्य दिनकर पाटील मतदान करीत असताना इव्हीएमसोबत त्यांचे मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण केल्याप्रकरणी सुभाष दत्तात्रय जाधव (२७, चव्हाण प्लॉट, सांगलीवाडी) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.