मिरज : किडनी मिळवून देण्याच्या आमिषाने हैदराबाद व विशाखापट्टणम येथील दोघा भामट्यांनी रुग्णास दहा लाखांचा गंडा घातला. याबाबत माजी आमदार परशुराम प्रभाकर उपकर (वय-५९, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांनी मिरज शहर पोलिसांत नंदगोपाल (रा. माधवनगर, तिरुवल्लूर, तामिळनाडू) व व्यंकटेश राव ऊर्फ वेंकी (अपोलो मेडिकल कार्यालय, हैदराबाद) या दोघांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
माजी आमदार उपरकर यांच्या चार वर्षापूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. किडनी प्रत्यारोपणासाठी ते सिंधुदुर्गहून मिरजेत खासगी रुग्णालयात आल्यानंतर तेथे नंदगोपाल याच्याशी त्यांची ओळख झाली. नंदगोपाल याने आपण वैद्यकीय व्यवसायात असून, अनेक मोठे डॉक्टर ओळखीचे असल्याचे सांगितले. काही डॉक्टरांसोबत त्याचे फोटो दाखवून नंदगोपाल याने त्यांचा विश्वास संपादन केला. किडनी उपलब्ध करून प्रत्यारोपणासाठी दहा लाखांचा खर्च येईल, असे सांगितले.
किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी उपरकर यांच्याकडून त्याने आगाऊ पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर नंदगोपाल याने त्यांना हैदराबादमध्ये व्यंकटेश राव याच्याकडे नेले. तेथे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या वैद्यकीय तपासण्यांचा बनाव करून आणखी पाच लाख रुपये घेतले. दहा लाख रुपये देऊनही किडनी प्रत्यारोपण पूर्ण झाले नाही. वर्ष उलटल्यानंतरही दोघांनी किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली नसल्याने उपरकर यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. वारंवार मागणी केल्यानंतर पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.