आष्टा : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव भाऊसाहेब शिंदे (वय ८१) यांचे आष्टा (ता. वाळवा) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आष्टा शहर आणि परिसरातील सर्व गावांमध्ये बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.गेल्या वर्षभरापासून शिंदे यांना मूत्रपिंडाचा विकार सुरू झाला होता. त्यातच त्यांना धापही लागत होती. त्यांच्या हृदयावर विदेशात शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच विश्रांती घेत होते. गुरुवार, दि. १३ रोजी कोल्हापूर येथे डायलेसिस करण्यात आले होते.सोमवारी सकाळी साडेपाचला त्यांना उलट्यांचा त्रास झाला म्हणून येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच सहाच्यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नप्रभा शिंदे व माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, मुले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य, भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे व माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, मुलगी वैशाली अजय जाचक (बारामती), बंधू माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांच्यासह तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.दोनच दिवसांपूर्वी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत त्यांनी शिल्पकार आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. तो त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.विलासराव शिंदे यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३८चा. त्यांचे वडील भाऊसाहेब आष्ट्याचे पहिले नगराध्यक्ष होत. वडिलांकडून राजकीय वारसा मिळालेल्या शिंदे यांची राजकीय कारकीर्द १९६२ मध्ये सुरू झाली. प्रथमत: ते सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. १९६७-७८ दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद सांभाळले. या काळात त्यांनी जिल्ह्यात इंग्रजी शिक्षणाबाबत शिंदे प्रगती योजना राबवली. पुढे ती राज्यभर राबवण्यात आली.१९७८ मध्ये ते काँग्रेसकडून तत्कालीन वाळवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठिंब्यावर राजारामबापू पाटील आणि एन. डी. पाटील या दिग्गजांचा पराभव केला होता. ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती.१९९६ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक झाले. त्यानंतर त्यांनी बँकेचे अध्यक्षपद दीर्घकाळ भूषवले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजअखेर त्यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळले. यादरम्यान सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले.शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य महामंडळ अध्यक्ष, दुय्यम सेवा मंडळ पुणे सदस्य, महाराष्ट्र राज्य युवक कल्याण समिती सदस्य या पदांची जबाबदारी सांभाळली असून, राजाराम शिक्षण संस्था, जिल्हा ग्रंथालय संघटना, जिल्हा स्काऊट गाईड संस्था, खुजगाव धरण कृती समिती या संस्था-संघटनांचे अध्यक्षपद भूषविले होते.शांत, संयमी पण कडक शिस्तीचे कुशल संघटक अशी ओळख असणाऱ्या विलासराव शिंदे यांचे निधन झाल्याची बातमी वाºयासारखी पसरली. त्यानंतर जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि नागरिकांची आष्टा-सांगली रस्त्यावरील शिंदे यांच्या निवासस्थानी रीघ लागली.अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण शिंदे यांच्या आठवणीने गहिवरले होते. त्यांचे पार्थिव सकाळी सहा ते अकरा या वेळेत घरात ठेवल्यानंतर काही काळ शिंदे मळ्यात नेण्यात आले. त्यानंतर येथील विलासराव शिंदे माध्यमिक विद्यालयात नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी एकनंतर शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी पाचच्या दरम्यान शिंदे विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.आष्टा शहराचा चेहरामोहरा बदलण्यात योगदानआष्टा नगरपालिका सुरुवातीपासून शिंदे गटाच्या ताब्यात आहे. आष्ट्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजना राबवण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. शहरात सुमारे अडीच हजार घरकुले उभारण्यात आली आहेत. नवीन पाणीपुरवठा योजना, विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल, भाजी मंडई, फिश मार्केट यासह विविध विकासकामांद्वारे त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलला.
विलासराव शिंदे यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजतागायत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पेलली होती. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. ते सर्वोत्तम संघटकही होते. आम्ही २५ वर्षे एकत्र काम केले. त्यांच्या अकाली जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात सहभागी आहे.- आ. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष