अतुल जाधवदेवराष्ट्रे : कडेगाव तालुक्याच्या माजी महिला सभापती शोभाताई होनमाने यांनी प्रबळ इच्छाशक्तीद्वारे वयाच्या ५८ व्या वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिली व त्या परीक्षेमध्ये ६०.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या या प्रयत्नाचे व यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.वयाच्या कुठल्याही वयात महिला यशस्वी होऊ शकतात, मात्र त्या शैक्षणिक क्षेत्रात पिछाडीवर राहतात. ५० टक्के आरक्षण मिळून सुद्धा त्यांना योग्य न्याय मिळत नाही, त्यांना पुरुषी मानसिकतेपुढे झुकावे लागते. ही खंत कायम मनाला टोचत होती त्यामुळे शिक्षणाला कोणत्याही वयाची अट नसते. आपण कोणत्याही वयात आपले शिक्षण पूर्ण करू शकतो हे दाखवून देण्यासाठी व महिलांना राजकारणात बचत गटात व इतर क्षेत्रात काम करताना कोणती अडचण येऊ नये यासाठी मी दहावीची परीक्षा दिली आणि त्यात यश संपादन केले. सन १९८२ मध्ये मी नववीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर गेल्या ४० वर्षांत मी शिक्षणापासून वंचित राहिले होते. या कालावधीत कडेगाव तालुका सभापतिपद, अनेक बचत गटाच्या पदाधिकारी, तालुकास्तरावर काँग्रेसच्या विविध संघटनात्मक पदावर काम पाहिले आहे. अनेक वर्षांची आपली इच्छा होती की आपण दहावी उत्तीर्ण व्हावे आज ती इच्छा पूर्ण झाल्याची भावना शोभाताई होनमाने यांनी व्यक्त केली. देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये त्यांनी दहावीसाठी प्रवेश घेतला व त्यांनी सर्व विषयांमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवत हे यश संपादन केले.बारावीही उत्तीर्ण होणारकमी शिकलेल्या किंवा अशिक्षित महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाहीत. त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मी वयाच्या साठ वर्षांपर्यंत मी बारावीची परीक्षा सुद्धा देऊन उत्तीर्ण होण्याचा मानस ठेवला असल्याचे शोभाताई होनमाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
Sangli: शोभाताई होनमाने यांचे ५८ व्या वर्षी दहावी परीक्षेत यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:25 PM