दिलीप मोहिते विटा : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अॅण्ड अॅग्रो या नावाने रसायनविरहीत साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार करण्यात आला असल्याचे संस्थापक माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सांगितले.
साखरेपासून उपपदार्थांची निर्मिती सर्वच कारखाने करत असतात. परंतु, या पारंपरिक साखर कारखानदारीला छेद देत अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करीत विराज केन्सने रसायनविरहीत साखर निर्मितीचा जॅग्री शुगर उत्पादनाचा देशातील पहिला प्रकल्प आळसंद-खंबाळे येथील सुमारे १९ एकर माळरानावर उभा करण्यास सुरुवात केली आहे. तो आता अंतिम टप्प्यात आहे.
यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. उत्पादित रसायनविरहीत साखर परदेशात निर्यात होणार असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार केला आहे. प्रतिदिन १२५० टन ऊस गाळप क्षमता असलेला हा प्रकल्प शंभर टक्के स्वयंचलित आहे.
सध्या जागतिक बाजारपेठेत रसायनविरहीत साखर, गूळ, गुळाची पावडर, खांडसरी साखर या पदार्थांना सर्वाधिक मागणी असल्याने या पदार्थांच्या निर्मितीलाच विराज केन्स प्राधान्य देणार आहे.
ताकारी, टेंभू व आरफळ या जलसिंचन योजनांमुळे दुष्काळी खानापूर, तासगाव, कडेगाव, आटपाडी या तालुक्यात उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. येथील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता रसायनविरहीत साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प उभा राहत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चाचणी गळीत हंगाम घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.- अॅड. सदाशिवराव पाटील,माजी आमदार, विटा
विराज केन्स हा खासगी कारखाना असला तरी सहकार कायद्याच्या नियमाप्रमाणे शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात येईल. एफआरपीप्रमाणे ऊसदर देण्याबरोबरच तोडणी झालेला ऊस ४८ तासाच्या आत गाळप करणार आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्याउसाचे वजन, साखर उतारा यासह अन्य माहिती मोबाईल संदेशाव्दारे देण्यात येणार आहे.- विशाल पाटील,कार्यकारी संचालक,विराज केन्स