प्रताप महाडिक ।कडेगाव : व्यसनमुक्त, शोषणमुक्त समाज आणि सशक्त राष्ट्र निर्मितीचा गंभीरपणे विचार करणारे सोनकिरे (ता. कडेगाव) येथील ८४ वर्षांचे व मनाने तरुण असलेले सातवीपर्यंत शिकलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पांडुरंग पाटील ऊर्फ फडणीसनाना ग्राहक संरक्षण कायदा होण्याआधीपासून ग्राहक जनजागृती करीत आहेत.शासन आदेशानुसार १५ ते ३१ डिसेंबर या कालावधित ग्राहक जागरण पंधरवडा साजरा झाला. परंतु डोक्यावर गांधी टोपी, धोतर, पांढरा सुती शर्ट, पांढºया रंगाचे जॅकेट आणि खांद्याला शबनम अशा थाटात सर्वत्र दिसणारे फडणीस नाना हे काम सातत्याने करीत आहेत.
नानांची हुशारी पाहून त्यांच्या आत्या त्यांना फडणीस म्हणू लागल्या आणि सर्वांचे ते फडणीसनाना झाले. ते सध्या कडेगाव तालुका ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्राहक जनजागृतीसाठी गेल्या १५ दिवसात १५ गावांमध्ये १५ मेळावे घेतले आहेत. जनजागरण पंधरवडा आहे म्हणूनच नव्हे, तर ते नेहमीच शाळा, महाविद्यालये, विविध संस्था व सार्वजनिक ठिकाणी ग्राहक जागरणाचे काम व्यापक स्वरूपात करीत आहेत. ग्राहकांची फसवणूक करणाºया दुकानदारांना, खोट्या जाहिराती करणाºया अनेक कंपन्यांना त्यांनी ग्राहक न्यायालयात खेचले आहे. फडणीसनाना दिसायला साधे व वयोवृद्ध असले तरी, त्यांनी उपस्थित केलेल्या समाजहिताच्या मुद्द्यांवर आजही अनेकांना घाम फुटतो. जागृती होण्याच्यादृष्टीने ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी, कायद्याने मिळालेल्या अधिकारांची माहिती करून घेतल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही, यासाठी फडणीसनाना प्रबोधन करतात.
कृतीतून राबविला पुरोगामी विचारांचा सोनहिरा पॅटर्नसोनहिरा खोऱ्यातील सर्व गावांमध्ये त्यांनी स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविली आहे. नदी व ओढ्यामध्ये रक्षा विसर्जित करू नयेत, मृत व्यक्तीच्या अस्थी शेतामध्ये विसर्जित करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधावर एक फळझाड लावण्याचा निर्णय त्यांच्या पुढाकाराने झाला आहे. रक्षाविसर्जन व उत्तरकार्य आदी सर्व विधी ५ दिवसांमध्ये करून जुन्या कालबाह्य चालीरितींना फाटा देणारा पुरोगामी विचारांचा सोनहिरा पॅटर्न त्यांनी येथे राबविला आहे. यासाठी सोनहिरा विचार मंचच्या माध्यमातून ते सांगली व सातारा जिल्ह्यात प्रबोधन करतात.
- देहदान संकल्प
फडणीस नाना देहदान, अवयवदान, नेत्रदान याबाबतही समाजप्रबोधन करतात. नानांसह त्यांच्या कुटुंबातील १२ व्यक्तींनी देहदानाचा संकल्प केला आहे. त्यांनी देहदानासाठी अर्जही भरले आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावातील अन्य पाच व्यक्तींनी देहदानासाठी अर्ज केले आहेत.