अविनाश बाड आटपाडी : महसूल प्रशासनाने गेल्या १५ महिन्यात वाळूतस्करांवर धडक कारवाई करुन दंडात्मक कारवाईसह तब्बल ४ कोटी ३६ लाख ७४ हजार ३२९ रुपयांचे विक्रमी गौणखनिज जमा केले आहे. राज्यात प्रथमच वाळूतस्करी करताना जप्त केलेली वाहने परत न नेणाऱ्या ६३ वाहनांचा लिलाव करुन दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.तालुक्यात एकमेव असलेल्या माणगंगा नदीवर आणि गावा-गावातील ओढ्यातील वाळूवर डल्ला मारणाºया वाळूतस्करांची तालुक्यात मोठी साखळी आहे. या वाळूतस्करांचे गुप्तहेर दिवसरात्र तहसील कार्यालय परिसर, चौक आणि रस्त्यांवर बसून असतात. रात्री तहसील कार्यालयातून वाळूविरोधी पथकाची जीप हलली, की हे गुप्तहेर सावध होतात.
दुचाकीवरुन जरी महसूल कर्मचारी निघाले, तर चौका-चौकात वाळूतस्करांचे थांबलेले गुप्तहेर कोणत्या दिशेने कर्मचारी येत आहेत, हे मोबाईलवरुन पुढे सांगतात. कर्मचाऱ्यांचा सतत पाठलाग होत असल्याने तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पोलीस ठाण्यात या गुप्तहेरांबद्दल तक्रार दिली. सतत वाळूतस्करी करणाऱ्या ४ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला.अशा परिस्थितीतही महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यात ६० गावे आहेत आणि तलाठी मात्र १२ आहेत. तरीही या तलाठ्यांचे पथक तयार करुन एप्रिल २०१३ ते मार्च २०१९ या कालावधित ४९ वाहनांवर कारवाई केली. त्यांना ६९ लाख ७१ हजार ४०० रुपये दंड ठोठावला. त्यापैकी २५ वाहनधारकांनी २९ लाख ५४ हजार ३६० रुपये प्रत्यक्ष दंड भरला आहे.मात्र इतर वाहनधारकांनी जप्त केलेली वाहने नेली नाहीत. पथकाला वाहन सापडल्यानंतर चालक खोटे नाव, पत्ता सांगतात. पळून जातात. मग ही वाहने आणून रेशनच्या धान्याच्या गोदामाच्या परिसरात लावली जातात. आता तिथे नवीन वाहने उभी करायला जागा नाही. एवढी जप्त केलेल्या वाहनांची गर्दी झाली आहे.
सध्या तिथे ३ ट्रक, २५ ट्रॅक्टर आणि ३५ टेम्पो अशी वाहने आहेत. या वाहनधारकांना वारंवार नोटिसा काढूनही ते तहसील कार्यालयाकडे फिरकत नाहीत. अनेकांचे पत्ते बोगस असल्याने नोटिसा परत येत आहेत. यावर आता मोटार वाहन निरीक्षकांना बोलावून या वाहनांचे मूल्यांकन करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी वाहनांची येसप्रिंट आदी तांत्रिक माहिती घेण्यात आली आहे.
या वाहनांचा लिलाव करुन गौणखनिज दंडाची रक्कम शासनजमा करण्यात येणार आहे. यातील अनेक वाहने नवीन कोरी, सुस्थितीतील आहेत. त्यामुळे वाळूतस्करांची घाबरगुंडी उडाली आहे.