लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील बसस्थानक रस्त्यावरील राधा मेडिकलशेजारी राहणाऱ्या सूर्यवंशी कुटुंबाच्या घरात घुसून चौघाजणांच्या टोळक्याने चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत १३०० रुपयांची रोकड चोरून दहशत माजवत पलायन केले. मात्र सीसीटीव्हीमधील फुटेजवरून पोलिसांनी अवघ्या काही तासात या टोळीच्या मुसक्या आवळल्या. हा प्रकार सोमवारी रात्री साडेआठच्यासुमारास घडला.
याबाबत अनिता प्रशांत सूर्यवंशी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज नंदकुमार मुळीक (वय २२, दत्तनगर, इस्लामपूर), चेतन बाबासाहेब पवार (२०), विनायक ऊर्फ विकास विष्णू पाटील (२५, तानाजी चौक, इस्लामपूर) आणि ऋषिकेश जालिंदर पाटील (२२, पाटील गल्ली) अशा चौघांविरुद्ध जबरी चोरी, मारहाण आणि बेकायदा शस्त्राचा वापर केल्यावरून गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे.
प्रतीक आणि अभिषेक सूर्यवंशी या दोन भावांसोबत हल्लेखोरांचा यापूर्वी वाद झाला होता. त्या रागातून हल्लेखोर सोमवारी रात्री चाकू आणि कोयता घेऊन त्यांच्या घरात घुसले. तेथे दोघा भावांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील साहित्याची नासधूस केली. यावेळी घरातील १३०० रुपयांची रोकड चोरत शस्त्राचा धाक दाखवत दहशत माजवून दुचाकीवरून पलायन केले.
यातील हल्लेखोर पंकज मुळीक हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दहशत माजवणे अशाप्रकारचे पाच गुन्हे नोंद आहेत. ही घटना घडल्यावर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे आणि निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून सर्व हल्लेखोरांच्या अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या. त्यांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता, चौघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या कारवाईत अमोल चव्हाण, भरत खोडकर, आनंद देसाई आणि उमाजी राजगे यांनी भाग घेतला.
फोटो-