विवेकानंद सीताराम होवाळे हे दि. १८ रोजी आईला नेण्यासाठी मुंबईहून मिरजेत आले होते. रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास त्यांनी शहर बसस्थानक चौकात राजू शेख या रिक्षाचालकाकडे भाड्याने रिक्षाबाबत चौकशी केली. त्यानंतर ते रस्त्याने चालत जाऊ लागले. रिक्षाचालक राजू शेख याने होवाळे यांचा पाठलाग करून त्यांना पाठीमागून धक्का मारून गळ्यातील चेनला हिसडा मारून पलायन केले. चेन हिसकाल्यानंतर शेख याचा पाठलाग करण्याचा प्रयत्नात होवाळे रस्त्यावर पडले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
चेन हिसकावल्याचा गुन्हा दाखल होताच गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे, उपनिरीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने जलद तपास करून शेख यास चोवीस तासात ५५ हजार रुपये किमतीच्या चेनसह अटक केली. शेख हा सराईत गुन्हेगार असून त्यास तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद आहे.