अटक केलेल्यांत सुरेश कारभारी हिरगोड (वय ३०), अनिल सुरेश काळेल (२९), रामेश्वर नीळकंठ जोगदंड (५४, तिघे उरवडी, ता मुळशी, जि पुणे, मूळ गाव नरवडी, ता. सोनपळे, जि. परभणी), तानाजी रावसाहेब जाधव (४५, रा, निगडी खुर्द, ता. जत) या चौघांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचा साथीदार विजय कराळे (रा. उरवडी, ता मुळशी, जि पुणे) हा फरार आहे.
मूळ चपरासवाडी (शेगाव) येथील असलेले तुकाराम शिवाजी ताटे हे निगडी खुर्द, बनाळी रस्त्यावरील शेतात एकटेच राहात होते. २६ एप्रिल रोजी साडेचारच्यादरम्यान त्यांचा धारदार शस्त्राने खून झाला होता. तेव्हापासून त्यांचा मोबाईल व स्कॉर्पिओ गाडी गायब झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाला खुनाचा तपास करण्याची सूचना केली होती.
ताटे हे एकटेच राहात असल्याने आणि कुठलाही पुरावा मागे न ठेवल्याने संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृत ताटे यांचा काही दिवसांपूर्वी तानाजी जाधव याच्याशी वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जाधव याच्याकडे विजय कराळे हा टेम्पो घेऊन कामानिमित्त आला होता. त्यावेळी जाधव याच्या शेतात टेम्पो अडकला. तो बाहेर काढण्यासाठी जाधव व कराळे याने ताटे यांच्या शेतातून माती उकरली होती. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. पोलिसांनी तानाजी जाधव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखविताच जाधव याने विजय कराळे व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. निरीक्षक रविराज फडणीस व त्यांच्या पथकाने उरवडी येथे छापा टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले; तर विजय कराळे हा पोलिसांना मिळून आला नाही. पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे.