सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँड येथे मंगळवारी रात्री चार तरुणांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली मारून त्याला जखमी केले. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून दहा हजाराची रोकडही लुटली. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने दोन संशयितांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.अटक केलेल्यांत योगेश रमेश कुंभार (वय ३२, रा. कुंभार गल्ली, गावभाग) व प्रशांत रावसाहेब पवार (२६, रा. गणेशनगर, काळे प्लॉट) या दोघांचा समावेश आहे. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक इम्रानखान मेहबूब कनवाडे (३१, रा. माळी गल्ली, मिरज) याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.आकाशवाणीसमोर सोमवारी रात्री रमेश कोळी या तरुणाचा चार जणांनी दगडाने ठेचून खून केला होता. या घटनेनंतर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास योगेश कुंभार, प्रशांत पवार व इतर दोघे असे चारजण हॉटेल वुडलँडमध्ये आले. आम्ही रमेश कोळीची माणसे आहोत, तुमच्यामुळेच त्याचा खून झाला आहे, असे म्हणत काऊंटरवरील व्यवस्थापक इम्रानखान कनवाडे यांना बाजूला ओढत नेऊन मारहाण केली.यातील एकाने त्यांच्या डोक्यात बाटली फोडली. यात ते जखमी झाले. काऊंटरमधील दहा हजाराची रोकडही लुटली. मारमारी होत असताना हॉटेलमध्ये असणाऱ्या ग्राहकांची एकच धावपळ उडाली. त्यामुळे पळापळ झाली. याप्रकरणी योगेश कुंभार व प्रशांत पवार या दोघांची नावे निष्पन्न होताच त्यांना ताब्यात घेऊन सांगली शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
या कारवाईत पथकाकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके, महेश आवळे, मेघराज रुपनर, सचिन कुंभार, योगेश खराडे, सागर लवटे, संकेत कानडे, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे, किरण खोत यांनी भाग घेतला.दारूच्या बाटल्या, संगणकाची मोडतोडहॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्यानंतर जाताना चौघांनी हॉटेलमधील दारूच्या बाटल्या, संगणकाची मोडतोड केली. यात हॉटेलचे दीड लाखाचे नुकसान झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुंडाविरोधी पथकाने तपासाला गती दिली.