कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वारणा नदीवर असणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून, काळुद्रेपैकी उबाळे वस्तीवरील घरांना पाणी लागले असून, शिराळा-चांदोली मार्गावर काळुद्रे येथील मुख्य मार्गाची संरक्षण भिंत कोसळल्याने रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. अजूनही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
गेल्या चार दिवसांपासून शिराळा पश्चिम भागात पावसाने जोर धरला असून, बुधवारी आणि गुरुवारी २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याने वारणा नदीला पूर आल्याने आरळा-शितूर, चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे, बिळाशी भेडसगाव या पुलावरती पाणी आले असल्याने शाहूवाडी तालुक्याला जोडणारे पश्चिम भागातील रस्ते बंद झाले आहेत. पुराचे पाणी पात्राबाहेर पडल्याने मराठवाडी, चरण, मोहरे, नाठवडे, कोकरुड येथील स्मशानशेड, जनावरांच्या वस्त्या पाण्यात बुडल्या आहेत. नदीला आलेला पूर आणि चांदोली धरणातून पाणी सोडल्याने उबाळे वस्तीवरील १४ घरांत पाणी शिरले आहे. खराळे, काळुद्रे ओढ्यातील पाण्याचा दाब वाढून शिराळा-चांदोली राज्य मार्गावरील संरक्षण भिंत पडून शेजारील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. चार झाडे पडली आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मेणी ओढ्याला पूर आल्याने येळापूर- समतानगर पुलावर पाणी आहे.