सांगली : सेक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत सांगली जिल्हा मध्यवती बॅँकेने ताब्यात घेतलेल्या चार संस्थांच्या मालमत्तांची व मशिनरीची विक्री प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली आहे. यामध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्यासह पलूस येथील डिवाईन फूडस (इंडिया) प्रा. लि., इस्लामपूरची शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी व प्रतिबिंब मागासवर्गीय को-आॅप इंडस्ट्रीज या चार संस्थांचा समावेश आहे.
जिल्हा बॅँकेने सात १२ थकबाकीदार संस्थांना सिक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत नोटिसा बजवल्या आहेत. या संस्थांकडे सुमारे ४५० कोटींची थकबाकी आहे. कर्जाची थकबाकी वाढत असल्याने व कर्जवसुलीस संस्थांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बँकेने सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत कारवाईस सुरुवात केली आहे. यातील काही संस्थांचा प्रतिकात्मक ताबा घेण्यात आला होता. यातील पाच संस्थांना दिलेली मुदत संपल्याने त्यांच्या मालमत्तांसह प्लॅँट व मशिनरीच्या विक्रीची निविदा बॅँकेने बुधवारी प्रसिद्ध केली.
महांकाली साखर कारखान्याची एकूण थकबाकी १३८ कोटी ५३ लाख ९५ हजार रुपये आहे. आटपाडीच्या माणगंगा कारखान्याकडे १०६ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये, तर डिवाईन फूडस, शेतकरी विणकरी सूतगिरणी व प्रतिबिंब मागासवर्गीय को-आॅप इंडिस्टीजकडेही कोट्यवधीची थकबाकी आहे.