कोकरूड : शिराळा तालुक्यातील येळापूरसह परिसरात गव्यांचे कळप दररोज शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. यामुळे नुकसानीची भरपाई देऊन गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून चार गव्यांच्या कळपाने सय्यदवाडी, गवळेवाडी, चव्हाणवाडी, येळापूरच्या शिवारात ठाण मांडले आहे. रात्रीच्या सुमारास शेतातील ऊस, मका यांची मोडतोड करून नुकसान करत आहेत. दिवसा डोंगर परिसरात दिसणारे हे चार गवे शेतीच्या दिशेने येऊन नुकसान करत आहेत. त्यांना हुसकावून लावण्याचे धाडसही वस्तीवर असणाऱ्या शेतकऱ्यांचे होत नाही. सोबत घेऊन गेलेली कुत्री फक्त भुंकण्याचे काम करत असूनही गवे जागचे हलत नसल्याने शेतकरीवर्गापुढे गप्प राहण्याशिवाय पर्याय नसल्याने नुकसान होत आहे. याबाबत वनविभागाच्या वनरक्षक देवकी तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. सध्या खरीप हंगामातील मशागत सुरू असूनही शेतकरी शेतातील कामे करण्यासाठी शेतात जाण्यासही धजावत नाही.