सांगली , दि. १७ : ऐन सणात उत्साहावर पाणी टाकत हजेरी लावलेल्या पावसाला आता दिवाळीच्या महत्त्वाच्या चार दिवसात उघडिप मिळेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला तर सणाचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होणार आहे.
सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात आॅक्टोबरचा पंधरवडा पावसाच्या हजेरीने चिंब भिजला. ऐन सणामध्ये पावसाने नागरिकांचे हाल केले. सणाच्या उत्साहावरही पाणी पडले. बाजारपेठांमधील खरेदीवरही पावसाचा परिणाम झाला. दररोज सायंकाळी लागणारी पावसाची हजेरी विक्रेते व खरेदीदार नागरिकांसाठी खुपच डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे यंदा दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार की काय, अशी चिंता व्यक्त होत होती.
पावसावरील विनोदही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. सणात तेवढी उघडिप मिळावी, अशी आशा बाळगलेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने मंगळवारी आनंदाची बातमी दिली.
हवामान खात्याच्या संकेतस्थळावर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत पावसाची उघडिप राहणार आहे, मात्र ढगाळ वातावरण राहणार असल्याने या काळात ऊन-सावलीचा अनुभव नागरिकांना येणार आहे. ढगाळ वातावरण असले तरी चालेल, मात्र पाऊस नको, अशी बहुतांश लोकांची भावना आहे. त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात येत्या चार दिवसात केवळ काहीठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. पावसाची शक्यता नाही. २१ आॅक्टोबरला तुरळक सरी, त्यानंतर २२ आॅक्टोबरला दाट धुके आणि २३ आॅक्टोबरला पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पावसाबाबत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीची रांगोळी, किल्ला, विद्युत रोषणाई आणि दिवे लावायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. आता लोकांना या आनंदापासून वंचित रहावे लागणार नाही.