सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांतील अतिक्रमणांवरील कारवाईला बळ देण्यासाठी आता महसूल विभाग सरसावला आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीला चार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणांसोबतच खुल्या भूखंडावरील झाडेझुडपेही काढली जाणार आहेत. त्याशिवाय वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, सुनील नाईक, सहायक आयुक्त रमेश वाघमारे, टीना गवळी, प्रशासन अधिकारी नकुल जकाते उपस्थित होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गेल्या आठवड्यापासून शहरातील मुख्य रस्ते, फूटपाथवरील अतिक्रमणांवर बडगा उगारला आहे. मेनरोड, मारुती रोड, बालाजी चौक, शिवाजी पुतळा परिसर, शास्त्री चौक, हरिपूर रोड, बसस्थानक परिसर, झुलेलाल चौकातील सुमारे ४०० हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली आहे. महापालिका पथकाच्या मदतीला आता उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीतील दोन प्रभागांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुचेता भिकाणे, मिरजेसाठी प्रांताधिकारी सुभाष बोरकर, जतचे प्रांताधिकारी अशोक पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मोहीम तीव्र केली जाणार आहे. शहरातील पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच त्याठिकाणी मुरूम टाकणे व स्वच्छतेचे कामही सुरु आहे. रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्याचा निश्चयही बैठकीत करण्यात आला. प्रत्येक चौकात दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत. शहरातील महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेकडील विद्यार्थ्यांनाही महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. येत्या दोन दिवसात त्याचे नियोजन करून बुधवारपासून विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. शहरातील मोकळे प्लॉट स्वच्छ करण्याची कारवाईही सोमवारपासून हाती घेतली जाणार आहे. प्लॉटधारकांनी स्वच्छता न केल्यास त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शहरातील गटारी, नाल्यांच्या स्वच्छतेसाठी ठेकेदारांचे साहाय्य घेतले जाईल. त्यांच्याकडील जेसीबीच्या साहाय्याने गटारी, नाले स्वच्छ करण्याची मोहीमही हाती घेतली जाणार आहे. सुमारे ४५० इमारतींतील पार्किंगच्या जागा बिल्डरांनी हडप केल्याचा अहवाल आहे. त्यांच्यावर कारवाई करून पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले आहेत. (प्रतिनिधी)औषध फवारणीसाठी २० ट्रॅक्टरमहापालिका क्षेत्रात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून येतात. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे मर्यादित यंत्रणा आहे. एकदा औषध फवारणी झाल्यानंतर पुन्हा त्या भागात फवारणीला महिन्याभराचा कालावधी लागतो. त्यावर जिल्हाधिकारी गायकवाड व निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी पर्याय शोधला आहे. जिल्ह्यातून २० ट्रॅक्टर औषध फवारणी यंत्रासह मागविले जाणार आहेत. दोन दिवसात संपूर्ण महापालिका हद्दीत औषध फवारणी केली जाणार आहे.भिंतींवर चित्रकाम होणारसांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांतील मुख्य रस्त्यावरील एक किलोमीटरपर्यंतचा परिसर रंगीबेरंगी करण्यात येणार आहे. या परिसरातील भिंतींवर शहरातील कलाकारांकडून चित्रे रंगवून घेऊन सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
अतिक्रमणांसाठी चार उपजिल्हाधिकारी रस्त्यावर
By admin | Published: January 01, 2016 11:24 PM