इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण कोविड उपचार केंद्रात बेकायदा जमाव जमवून डॉ. सचिन सांगरुळकरसह त्यांच्या पत्नी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. गणेश वसंत पाटील (कापुसखेड), रामदास आनंदा कचरे, सचिन ऊर्फ सनी मारुती खराडे (इस्लामपूर) आणि चंद्रकांत बाबूराव पाटील (बावची) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कापूसखेड येथील रूपाली पाटील यांचे पती धोंडीराम पाटील यांच्यावर डॉ. सांगरुळकर यांच्या रुग्णालयात कोविड उपचार सुरू होते. तेथे त्यांचे २ मे रोजी निधन झाले. या घटनेने संतप्त कुटुंबीयांनी उपचारात हलगर्जी झाल्याचा आरोप करत रुग्णालयाचे बिल न देता दंगा केला होता. त्यानंतर ७ मे रोजी वरील सर्वांसह ५०-६० जणांनी जमावबंदी आदेशाचा भंग करत रुग्णालयात घुसून डॉक्टरसह त्यांच्या पत्नी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केली होती. याप्रकरणी डॉ. सांगरुळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सर्वांविरुद्ध जमावबंदी आदेशासह आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा ठपका ठेवला होता.
वरील सर्व संशयितांचे अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केले. त्यानंतर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले.
न्यायालयासमोर त्यांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.