रेठरे धरण : सातवे (ता. पन्हाळा) येथे ऊसताेड करताना फडकऱ्यांना सापडलेली काेल्ह्याची चार पिले रेठरे धरण (ता. वाळवा) येथे वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतली. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.रेठरे धरण येथे एका कारखान्यासाठी ऊस तोडणाऱ्या कामगारांना सातवे येथे तोड सुरु असताना तीन मादी व एक नर अशी चार काेल्ह्याची पिले मिळाली. आईपासून दुरावलेली ही पिले लहान असल्याने त्यांच्या काळजीपाेटी हे कामगार पिले आपल्यासाेबत रेठरे धरण येथे घेऊन आले होते. अंदाजे तीन ते चार महिन्यांची ही पिले माणसाळली आहेत.याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी व सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या सूचनेनुसार रेठरे धरण येथील परिटकी शिवारातील उसाच्या फडातून ही चारही पिले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली. वैद्यकीय चाचणी करून या पिलांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.वनरक्षक विशाल डुबल, क्षेत्रीय सहायक शहाजी पाटील, वनकर्मचारी पांडुरंग उगळे, सचिन कदम, विलास कदम, गोरख गायकवाड, प्राणीमित्र युनूस मणेर यांनी भाग घेतला.
सातवे येथे सापडली कोल्ह्याची चार पिले, वनविभागाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 12:52 PM