सांगली : ग्रामपंचायतीच्या कामकाजात हालगर्जीपणा आणि पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्चाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कडेगाव, पलूस तालुक्यातील चार ग्रामसेवक निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग, तुपेवाडी, येतगाव आणि पलूसचे एक अशा चार ग्रामसेवकांना निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडे जवळपास २०० कोटी रुपयांचा पंधरा वित्त आयोगाचा निधी अखर्चीत आहे. निधी असूनही विकास कामे होत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींच्या होत्या. तक्रारींची गंभीर दखल घेऊन मुुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, मुख्य वित्त व लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, प्रमोद काळे यांच्या उपस्थितीमध्ये पलूस, कडेगाव तालुक्यांमधील ग्रामपंचायतींच्या निधी खर्चाचा आढावा दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला. या आढावा बैठकीत वडिये रायबाग येथील ग्रामसेविका मुल्ला, तुपेवाडी ग्रामसेवक डी. बी. साठे, येतगावचे ग्रामसेवक रमेश धाबेकर, पलूस तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी लकप्पा आमशिद सनदी यांनी वित्त आयोगाचा निधी खर्चाकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाकडे लक्ष दिले नसल्याचा प्रशासनाने ठपका ठेवला आहे. त्यानुसार वरील चार ग्रामसेवकांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.
या ग्रामपंचायतींची होणार चौकशीकडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, तुपेवाडी या ग्रामपंचायतींच्या कारभाराबद्दल तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीच्या सर्व कारभाराची चौकशी करून दोषींवर आरोप निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती तृप्ती धोडमिसे यांनी दिली.