लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : तोंडोली (ता. कडेगाव) येथील हसत्याखेळत्या एकत्र कुटुंबाला कोरोनाने गाठले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या पंधरा दिवसात परिवारातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तोंडोली येथील शेतकरी अनिल सुखदेव मोहिते यांच्या आई वैजयंता मोहिते (वय ७५) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना कडेगाव येथे प्राथमिक उपचार करून कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना ३० एप्रिल रोजी रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान अनिल यांचे वडील सुखदेव पांडुरंग मोहिते (८०) यांना कोरोनाची बाधा झाली. वयोवृद्ध असलेल्या सुखदेव यांना उपचारासाठी बेड
मिळाला नाही. यामुळे त्यांचा घरी
६ मे रोजी मृत्यू झाला. आई आणि वडिलांच्या निधनाच्या दुःखातून परिवार सावरत असतानाच पुन्हा या कुटुंबाला कोरोनाने पछाडले. अनिल यांचे मोठे भाऊ अशोक मोहिते (५८) मुंबई येथे रंगकाम करतात. ते लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी
गावी आले होते. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कडेगाव कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असतानाच १५ मे रोजी अशोक यांचाही मृत्यू झाला.
नियतीचा हा खेळ एवढ्यावरच थांबला नाही तर या दुःखात आणि धावपळीत अनिल मोहिते (४७) यांनाही कोरोनाने गाठले आणि
विटा येथील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान अनिल यांचाही १६ मे रोजी मृत्यू झाला. वृद्ध आई-वडील आणि त्यांची दोन कर्तीसवरती मुले अशा चार जणांचा बळी गेला.
चौकट
माणुसकीतून मदतीची गरज
अशोक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा तर अनिल यांच्या पश्चात
पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या कुटुंबाच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. या दुःखातून सावरण्यासाठी
या उदध्वस्त झालेल्या कुटुंबाला शासनाने व समाजाने मदत करण्याची गरज आहे.