सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील आणखी चौघांना रविवारी रात्री अटक करण्यात यश आले. अटकेतील संशयितांची संख्या आता आठ झाली आहे. टोळीतील आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. ते सांगली परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक कोल्हापूर जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये प्रभाकर बाळकृष्ण रावळ (वय २९, रा. दुधगाव, ता. मिरज), संदीप महादेव मुडलगी (२९, पटेल चौक, जयसिंगपूर), दीपक श्रीशैल हुडेद (२७, आठवी गल्ली, जयसिंगपूर) व बालाजी विठ्ठल निकम (३४, भेंडवडे, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चार दिवसांपूर्वी दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ऐनुद्दीन ढालाईत यास मिरजेत बनावट नोटा खपविण्यास आल्यानंतर रंगेहात पकडले होते. त्याच्याकडून ३४ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर दत्तवाड येथे बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. अटकेतील ऐनुद्दीन ढालाईत, सुभाष पाटील, रमेश घोरपडे व इम्रान ढालाईत यांच्या चौकशीतून सहाजणांची नावे निष्पन्न झाली होती. यापैकी चौघांना अटक केली आहे. संशयित रावळचा आष्टा (ता. वाळवा) येथे छापखाना होता. दोन वर्षांपूर्वी तो बंद पडला आहे. त्याला छपाईचा चांगला अनुभव होता. मुडलगी व हुडेद हे दोघे स्कॅनर व प्रिंटरमधील तज्ज्ञ आहेत. निकम यास नोटांच्या छपाईवेळी मदतीसाठी सोबत घेण्यात आले होते. नोटा छपाईची कल्पना ढालाईत पित्रा-पुत्रांची होती. मुडलगी व हुडेद यांना स्कॅनर व प्रिंटर दुरुस्तीचे कारण सांगून दत्तवाडला नेले होते. त्यानंतर त्यांच्याकडून नोटांची छपाई करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांनी पहिल्यांदाच एकत्रित येऊन एका रात्रीत ३४ लाखांच्या नोटांची छपाई केली. या सर्व नोटा मिरजेतील एका बँकेत खपविण्याचा त्यांचा प्रयत्न होता; मात्र तत्पूर्वीच ते पोलिसांना सापडले. यापूर्वी त्यांनी कोठेही नोटा चलनात आणल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी) पाचशेचा प्रयत्न फसला संशयितांनी पाचशेच्या नोटांची छपाई करण्याचा प्रयत्न केला होता; पण ही नोट व्यवस्थित स्कॅन झाली नाही. त्यामुळे त्यांनी केवळ एक हजाराच्या नोटांची छपाई केली. ऐनुद्दीन ढालाईत याने नोटा चलनात आणण्याची जबाबदारी घेतली होती. हा कट यशस्वी झाल्यानंतर ते पुन्हा बनावट नोटांची छपाई करणार होते. हा तपास सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. संदीप माजी नगरसेवकाचा भाचा संदीप मुडलगी हा जयसिंगपूर येथील माजी नगरसेवकाचा भाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या माजी नगरसेवक मामाने भाच्याला वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, तरीही त्याला अटक केली. दुसरा संशयित बालाजी निकम याला सहा महिन्यांपूर्वी गोव्यातून दारूची तस्करी करताना पकडले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
आणखी चौघांना अटक
By admin | Published: July 14, 2015 12:42 AM