कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) पोलीस ठाण्याच्या वतीने वारणा नदीवरील आणखी चार पूल बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी कोकरूड आणि मेणी फाटा येथे जिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. पश्चिम भागात येणारे सर्व मार्ग बंद करीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कोकरूड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाबंदी जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोकरूड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कोकरूड येथील वारणा नदीच्या पुलावर कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी, तर सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी मेणीफाटा येथे जिल्हा नाकाबंदी करण्यात आली होती.
बुधवारपासून नव्याने कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांनी प्रवेश करू नये, म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे शिराळा पश्चिम भागातील बिळाशी-भेडसगाव, कोकरूड-रेठरे-वारणा, चरण-सोंडोली, आरळा-शितूर वारुण हे चार पूल बुधवारी बंद करण्यात आले आहेत.
परवानगीशिवाय कोणालाही सोडले जाणार नाही, तसेच जे नियम पाळणार नाहीत अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हाबंदी असल्याने यापूर्वी कोकरूड आणि मेणी फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली आहे.
कोट
वारणा नदीवर असणारे चारही पूल बंद केले आहेत. त्यातूनही कुणी जिल्हाबंदी असताना कोणत्याही मार्गाचा दुरुपयोग करुन जिल्ह्यात प्रवेश केल्यास आणि विनामास्क व विनाकारण फिरून नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल.
-ज्ञानदेव वाघ सहायक पोलीस निरीक्षक, कोकरूड.