दिलीप मोहितेविटा (सांगली) : भरधाव खासगी बस व मोटारीच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. हा अपघातसांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) शहराजवळ आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास झाला. मृतात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. हे चौघेही गव्हाण (ता. तासगाव) येथील काशीद कुटुंबातील आहेत. अपघातात सुनीता सदानंद काशीद, चंद्रकांत दादाबो काशीद, अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्व रा. गव्हाण, ता. तासगांव, जि. सांगली) आणि बदली मोटार चालक योगेश कदम (रा. मालाड, मुंबई) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत.तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील सदानंद काशीद हे सध्या आपल्या नातेवाईकांसह मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या गावची शुक्रवारी यात्रा असल्याने काशीद हे मालाड मुंबई येथून आपल्या नातेवाईकांसह मुंबई येथील बदली मोटार चालक योगेश कदम यांना घेऊन आपल्या चारचाकी गाडीतून आज गुरुवारी मध्यरात्री मालाडहुन आपल्या गावी गव्हाणकडे निघाले होते. गुरूवारी सकाळी साडे सात वाजण्याच्य सुमारास विटा शहराजवळ नेवरी रस्त्यावर त्यांची मोटार आली असताना विट्याहून प्रवाशी उतरून नेवरी गावाकडे निघालेल्या गीतांजली ट्रॅव्हल्स (क्र. ए .आर. - ०१- जे८४५२) या खासगी बसवर चालकाच्या बाजूला कारची जोरदार धडक झाली. यात कारमधील सदानंद काशीद हे जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि मालाड येथील बदली मोटार चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले.हा अपघात इतका भीषण होता की धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी सदानंद काशीद यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचे वृत गव्हाण गावात समजताच गावावर शोककळा पसरली. ऐन यात्रेच्या कालावधीत काशीद कुठुंबियांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Sangli News: खासगी बस-मोटारीच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार, यात्रेला जाताना काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 11:14 AM