इस्लामपूर : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्तीची तीन लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेऊन उपचार केल्याचा प्रकार येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. तसेच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आणखी दोन लाख १७ हजार रुपये इतक्या बिलाची मागणी करीत नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यास विलंब लावत मृतदेहाची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत हॉस्पिटलमधील चौघांविरुद्ध रात्री गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ ते १८ मे या कालावधीत घडली.
याबाबत नंदू नामदेव कांबळे (वय ३८, रा. आंबेडकर सोसायटी, जयसिंगपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इंद्रजित पाटील, अभिमन्यू पाटील, विश्वजित पाटील, प्रवीण माने आणि अन्य एक अनोळखी अशा पाचजणांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नंदू कांबळे यांचे मामा काशीनाथ शंकर कांबळे (६६, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ) यांना २ मे रोजी कोरोनावरील उपचाराकरिता दाखल करताना शासनाच्या निर्धारित रकमेपेक्षा तीन लाख ५० हजार रुपये इतकी जास्त रक्कम व्हेंटिलेटर बेड आणि मेडिकल बिलासाठी अनामत घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर कांबळे यांना आणखी दोन लाख १७ हजार ५१२ रुपये भरावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी कांबळे यांनी आपली परिस्थिती नाही असे सांगितले.
यावेळी वरील चौघांनी, ‘तुम्ही एवढे पैसे दिलेत कशावरून, ही रक्कम तुम्ही कोणाला दिली, पावती न देता एवढी रक्कम दिली कशी, तुमच्याकडे काय पुरावा आहे? रक्कम दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा’, अशी धमकी देत दमदाटी केली. १८ मे रोजी सकाळपासून ते दुपारपर्यंत मृतदेह ताब्यात न देता त्याची विटंबना करून फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे नंदू कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.