सांगली : नऊ महिन्यांपर्यंतच्या बालकांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणाला जिल्ह्यात प्रारंभ झाला. बालकांच्या नियमित लसीकरणावेळीच न्यूमोनिया प्रतिबंधक लस टोचली जात आहे. शासनातर्फे प्रथमच या लसीचा अवलंब करण्यात आला आहे.
न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) ही लस प्रत्येक बालकाला वयाच्या पहिल्या वर्षात तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे. दीड महिना, साडेतीन महिने आणि नवव्या महिन्यांत लस टोचली जाईल. सध्या पहिला टप्पा सुरू असून, जिल्ह्यात १५ जुलैला जिल्हा परिषदेतर्फे प्रारंभ झाला. लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, बालकांना बीसीजी व अन्य नियमित लसींसोबतच पीसीव्ही टोचली जाईल. यामुळे कोणताही अन्य त्रास होत नाही. यापूर्वी अशा इंजेक्शनमुळे ॲलर्जी झालेली असल्यास किंवा बाळ जास्त आजारी असल्यास पीसीव्ही लसीकरण टाळले जाते, अन्य सर्व बालकांसाठी मात्र ती पूर्णत: सुरक्षित आहे. लस टोचल्याने न्यूमोनिया होत नाही.
सध्या पाच वर्षांखालील बालकांमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव जास्त होतो. १८ ते २० टक्के बालमृत्यू ओढवतात. दोन वर्षांखालील बालकांसाठी जास्त धोका असतो. या स्थितीत पीसीव्ही लसीकरण जीवनदायी ठरणार आहे. सध्या दिली जात असलेली लस न्यूमोनियाच्या वेगवेगळ्या १० स्ट्रेनविरोधात परिणामकारक आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे चार हजार बालकांना लस दिली जाईल. त्यासाठी जिल्हा परिषदेला पुरेसे डोस प्राप्त झाले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालये आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत विनाशुल्क दिली जात आहे.
चौकट
कोरोनामध्ये पीसीव्ही लसीकरणाची भर
सध्या जिल्हाभरात कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. याच गर्दीत पीसीव्ही लसीकरणही सुरू झाले आहे. आरोग्य केंद्रांत कोरोनाचे लसीकरण नसेल, त्या दिवशी पीसीव्हीचे लसीकरण केले जात आहे. याद्वारे बालकांना गर्दीपासून सुरक्षित ठेवले जात आहे.