लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव :
टेंभू योजनेच्या नेवरी वितरिकेच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अनेक पिढ्यांचा पाण्यासाठीचा वनवास संपला आहे. योजनेमुळे परिसरातील चार हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
टेंभू योजनेअंतर्गत नेवरी बंदिस्त पाइपलाइन वितरिका योजनेचे जलपूजन संग्राम देशमुख यांच्या हस्ते झाले.
यावेळी देशमुख म्हणाले, कडेगाव तालुक्यातील ताकारी, टेंभू सिंचन योजनेपासून वंचित असणाऱ्या नेवरी पूर्व भागामधील जनतेचा ४० वर्षांपासून शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष चालू होता.
अनेक वर्षे तरतुदीविना ही योजना रखडली गेली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात भाजप सरकारने बंदिस्त पाइपलाइनचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री सिंचन योजनेत टेंभू योजनेचा समावेश झाला आणि या योजनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप आले. ४२ कोटी रुपये खर्चाची १२ कि.मी. लांबीची वितरिका पूर्ण झाल्याने हा भाग आता सुजलाम् सुफलाम् होईल.
यावेळी माजी सरपंच संतोष महाडिक, शिवाजी महाडिक, वसंत महाडिक, जगदीश महाडिक, लक्ष्मण माने, दत्तात्रय मस्के, गिरीश कुलकर्णी, बाळासाहेब महाडिक, दीपक महाडिक, गणेश पवार, हणमंत महाडिक, शहाजी मोरे, सचिन महाडिक, बबलू सावंत, मुकुंद सुकटे, सोमनाथ महाडिक उपस्थित होते.