तासगाव नगरपालिकेने १६ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी चार हजार दोनशे रुपयांचे शुल्क आकारणी करण्याचा ठराव केला होता.
पीपीई किटचे पंधराशे रुपये, बॉडी कव्हरसाठी सातशे, शववाहिकेसाठी एक हजार आणि गॅस दाहिनीसाठी एक हजार असे एकूण चार हजार दोनशे रुपये आकारणी करण्याचा निर्णय झाला होता.
एकीकडे अनावश्यक कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची टाकून शासनाच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून कोरोना संकटात सामाजिक बांधिलकी जोपासण्याऐवजी धंदा सुरू केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागला. लोकांचा रोष वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी १६ एप्रिल रोजी केलेला ठराव रद्द करून यापुढे सर्व अंत्यसंस्कार मोफत करावेत, असा आदेश प्रशासनाला दिला आहेे.
चौकट :
विरोधकांचे मौन कायम
अंत्यविधीसाठी पैसे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ठराव झाला तरी विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या ठरावाबाबत साधा आक्षेप नोंदवण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवर टीकेची झोड उठली आहे.
कोट
तासगाव नगरपालिकेचा कारभार ‘आंधळं दळतंय...’ असाच आहे. पालिकेकडून ठराव घेऊन अंत्यविधीसाठी पैसे घेतल्यानंतर मी स्वत: निवेदन देऊन विरोध केला होता. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा बेलगाम कारभार सुरुच राहिला. मृतांच्या अंत्यविधीसाठी पैसे घेणे म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार होता. आता हा प्रकार बंद करण्याचे जाहीर केल्याने उशिराने का असेना शहाणपणा सुचला आहे.
- संजय चव्हाण, शहरप्रमुख, शिवसेना