सांगली : जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याचा पगारच मिळाला नसल्यामुळे त्यांनी कर्ज काढून दिवाळी साजरी केली. एवढेच नव्हे, तर वर्षभर अंगणवाडीतील बालकांची सेवा करणाऱ्या सेविका व मदतनीसांना शासनाकडून मिळणारी एक हजार रुपयांची भाऊबीजही मिळाली नसल्यामुळे त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी पगार आणि भाऊबीज न मिळाल्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी सोमवार, दि. १० रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामीण भागातील तरुण पिढी मजबूत आणि सशक्त बनविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत आहेत. या सेविका व मदतनीस तुटपुंज्या मानधनावर राबत आहेत. परंतु, ते मानधनही त्यांना वेळेवर न देऊन शासन आणि राज्यकर्ते त्यांची थट्टाच करीत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सुमारे चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामीण भागातील बालकांना चांगले, संस्कारात्मक शिक्षण आणि आहार देण्याचे काम करीत आहेत. या सेविका आणि मदनीसांना आॅगस्टपासून तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे या सेविकांना कर्ज काढूनच दिवाळी साजरी करावी लागली. प्रत्येक सेविकांना देण्यात येणारी तुटपुंजी एक हजाराची भाऊबीजही दिवाळीपूर्वी मिळाली नाही. प्रशासनाच्या या गैरकारभारामुळे सेविका आणि मदतनीसांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.अंगणवाडी सेविका संघटनेचे बिराज साळुंखे म्हणाले की, सेविका व मदतनीसांना तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. दिवाळी झाली तरी भाऊबीज मिळाली नाही. शासनाने सेविकांना ९५०, तर मदतनीसांना ५०० रुपये मानधन वाढविले आहे. वाढीव मानधनही सेविकांना आजपर्यंत मिळाले नाही. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. १० रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एवढ्यावरही शासनाने लक्ष दिले नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहे, असा इशाराही साळुंखे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)वाढीव मानधनही नाहीशासनाने सेविकांना ९५०, तर मदतनीसांना ५०० रुपये मानधन वाढविले आहे. वाढीव मानधनही सेविकांना आजपर्यंत मिळाले नाही.मोर्चानंतरही सेविका, मदतनीसांना मानधन वेळेत न मिळाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणारआंदोलन कालावधीतील एक महिन्याचे मानधन त्वरित मिळावे
चार हजार सेविका, मदतनीस पगाराच्या प्रतीक्षेत
By admin | Published: November 04, 2014 10:17 PM