सांगली : जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल न केल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह टोकाला गेला असून, त्याचा अनुभव ऑनलाईन सभेच्या विरोधातील आंदोलनावरुन आला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ऑनलाईन सभा रद्दसाठी केलेल्या आंदोलनात सहभागी २५ सदस्यांमध्ये १४ सदस्य भाजपचे होते. यावरुन पदाधिकारी बदल न केल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेत सव्वा वर्षानंतर पदाधिकारी बदलाचे ठरुनही भाजप नेत्यांनी शब्द न पाळल्यामुळे सदस्यांच्या मनामध्ये मोठी खदखद व्यक्त होत आहे. सोमवारी ऑनलाईन सभेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचेच सदस्य अग्रेसर होते. या आंदोलनात सभापती जगन्नाथ माळी, सभापती प्रतोद शेंडगे, डी. के. पाटील, अरुण राजमाने, अरुण बालटे, नितीन नवले, सरदार पाटील, सरिता कोरबु, शोभा कांबळे, मनोज मुंडगनूर, संपतराव देशमुख, सुरेंद्र वाळवेकर, मोहन रणदिवे, रेखा बागेळी सहभागी झाले होते. या सदस्यांनी सत्ताधारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या ऑनलाईन सभेच्या भूमिकेला जोरदार विरोध केला. तसेच पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणाबाजी करुन आंदोलन केले. भाजपच्या सदस्यांची ही आक्रमकता भाजपसाठी धोक्याचीच घंटा म्हणावे लागले, असेच चित्र आहे. भाजपकडे जिल्हा परिषदेत २५ सदस्य संख्या असून, त्यापैकी १४ सदस्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत यापैकी किती सदस्य भाजपबरोबर राहणार, हे आगामी काळच ठरविणार आहे.
चौकट
ओबीसी आरक्षणावर फेरयाचिका दाखल करा
जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सोमवारी अनेक विषयांवर चर्चा झाली. ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाने त्वरित फेरयाचिका दाखल करावी, अशी मागणी तम्मनगौंडा रवी -पाटील यांनी केली. तसा ठराव करुन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्राजक्ता कोरे यांनी दिले.
चौकट
नवे राजकीय समीकरण
ऑनलाईन सभेला विरोध करण्याच्या निमित्ताने सोमवारी जिल्हा परिषदेत नवीन राजकीय समीकरणे उदयास येत असल्याचे दिसून आले. आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर भाजपतील नाराज खासदार संजयकाका पाटील गटाचे बारा सदस्य सहभागी झाले होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत खासदार गट महाविकास आघाडीसोबत राहण्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण पाहावयास मिळणार आहे.