सांगली : मुरमाच्या रॉयल्टीची रक्कम भरल्याचे बोगस चलन तयार करून ठेकेदाराने शासनाची ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. रॉयल्टीमधील बोगसगिरीचे हे प्रकरण असल्याने महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविली आहे.सांगलीत महापालिकेच्या एका कामासाठी लागणारा मुरूम संबंधित ठेकेदाराने कुमठे हद्दीतून उत्खनन करून उचलला आहे. रॉयल्टीचे ९५ हजार रुपये स्टेट बँकेत जमा केल्याचे चलन संबंधित ठेकेदाराने केले आहे. हे चलनच बोगस असल्याची माहिती समोर आली आहे.
या चलनावरील बँकेचा शिक्का आणि सह्या बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. रॉयल्टी चोरीचा हा प्रकार समोर आला आहे. रॉयल्टीतील बोगसगिरीचे हे प्रकरण महसूल विभागाकडे येत आहे. त्यामुळे महापालिकेने त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले आहे. महसूल विभागाकडून यापुढील कार्यवाही होणार आहे.
स्टेट बँकेच्या तासगाव शाखेतील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये एका व्यक्तीने एक चलन टाकले होते. या चलनाची शहानिशा करावी व बोगसगिरी चव्हाट्यावर आणावी हा उद्देश त्यामागे होता. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी या चलनाची शहानिशा केली. चलनावरील शिक्का, सह्या बोगस असल्याचे चव्हाट्यावर आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तासगावच्या तहसीलदार यांना त्याबाबत कळविलेे. महापालिकेच्या कामापोटी रॉयल्टी भरल्याचा उल्लेख असल्याने तहसीलदार यांनी महापालिकेशी संपर्क साधला. रॉयल्टीतील बोगसगिरीचे प्रकरण महसूल विभागाकडे येत असल्याने महापालिकेने त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले आहे.