सांगली : कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना ५० हजार रुपये साहाय्यता निधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने यासाठी दोन संकेतस्थळ विकसित केले असून, त्यावर कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे अर्ज करता येणार आहे. मात्र, हा साहाय्यता निधी मिळवून देतो म्हणून दलालांकडून बोगस मेसेज सध्या व्हायरल झाले आहेत. यातून लुटीचा बाजार मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सहायता निधी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यापासून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाने केलेल्या शिरकावामुळे जिल्ह्यातील पाच हजार ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसदारांना हा लाभ मिळणार आहे.प्रशासनाने यासाठी संकेतस्थळ विकसित केले असून, त्यावर मोबाइल क्रमांकाच्या आधारे नोंदणी केल्यानंतर केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करता येणार आहे.मात्र, जिल्ह्यातील काही नागरिकांना साहाय्यता निधीसाठी कागदपत्रांसह भेटण्याचे मेसेज आले आहेत. प्रशासनाने ऑफलाइनपद्धतीने कोणतीही सुविधा सुरू केलेली नसल्याने अशापद्धतीने मेसेज आल्यास ती फसवणूक होण्याचीच शक्यता आहे. कोरोना मृतांच्या वारसांना त्रास होऊ नये यासाठी कमीतकमी कागदपत्रांत आणि कोणतेही जादा शुल्क न भरता हा लाभ मिळणार आहे. मात्र, अर्ज करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे काम काहीजणांनी सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे.संकेतस्थळावर सुविधा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराने ‘महाकोविड-१९रिलिफ डॉट इन’वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच ‘ईपासएमएसडीएमए डॉट महाआयटी डॉट ओरजी’ या संकेतस्थळावरही लिंक देण्यात आली आहे. यावर केवळ ऑनलाइनपद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत.
कोरोना साहाय्यता निधी लाभ मिळविण्यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येतात. यापूर्वी अर्जाबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. आता दिलेल्या संकेतस्थळावरच वारसांनी आपली नोंदणी करावी. - डॉ. वैभव पाटील, नोडल अधिकारी