सांगली : शेतजमीन देण्याच्या आमिषाने एकास ३१ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सांगलीचे भाजप खा. संजय पाटील यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिसासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जयदेव रामचंद्र काळे यांनी पोलिस कर्मचारी कृष्णदेव रामचंद्र पाटील, विनायक रामचंद्र सुतार, अरविंद मच्छींद्र पाटील आणि सुधीर ऊर्फ भय्या शिंगाटे यांच्यासह अनोळखी आठ जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांना अटक केली आहे.
जानेवारी २०१८ मध्ये संशयितांनी फिर्यादी काळे यांना तासगाव ते कुमठा फाटा मार्गावर रसूलवाडी रस्त्यावरील आठ एकर १६ गुंठे जमिनीची विक्री करायची असून, ती खरेदी करण्याची गळ घातली होती. यावेळी काळे यांनी त्यांचे मित्र विजय चव्हाण यांना ही जमीन दोघांत घेऊ, असे सांगत पुढील व्यवहार केले होते.
यात खरेदीची इसारा रक्कम म्हणून १ लाख रुपये आणि सात-बारा उताऱ्यावरील बँकेचा बोजा कमी करण्यासाठी २४ लाख आणि धनादेशाने ६ लाख असे एकूण ३१ लाख रुपये दिले होते.
संशयितांना पाच दिवसांची कोठडीया गुन्ह्यात पोलिस कृष्णदेव पाटील याच्यासह विनायक सुतार, अरविंद पाटील यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, सर्वांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.