ऊसतोड मजूर टोळ्यांच्या मुकादमांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. ज्यांनी फसवणूक केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत.
फसवणूक झालेल्या कंत्राटदारांनी मंगळवारी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची भेट घेऊन व्यथा मांडली. यावर कदम यांनी वाहतूकदारांचा प्रश्न समजून घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांच्याशी चर्चा केली व वाहतूकदारांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली. बुधवारी सकाळी ऊस वाहतूकदारांनी गेडाम यांची भेट घेतली. संबंधित मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती केली. यावर गेडाम यांनी फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी द्याव्यात, पुरावे सादर करावेत, तक्रारींची खातरजमा करून गुन्हे दाखल केले जातील, असे वाहतूकदारांना सांगितले तशा सूचनाही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे आता फसणूक करणाऱ्या मुकदमांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
‘लोकमत’च्या दणक्याने न्याय : ‘लोकमत’ने ‘ऊस वाहतूक कंत्राटदारांची फसवणूक’ असे वृत्त देऊन आमच्या प्रश्नाला वाचा फोडली. या दणक्याने न्याय मिळत असल्याची भावना
फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदारांनी व्यक्त केली.
फोटो ओळ : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना निवेदन देताना ऊस वाहतूक कंत्राटदार तसेच सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व जितेश कदम आदी.